लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी (पुणे) : आगामी २०२४ च्या विधानसभेची वाट कशाला पाहायची, आताही मुख्यमंत्री व्हायला मला आवडेल, अशी इच्छा विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पिंपरीतील कार्यक्रमात शुक्रवारी व्यक्त केली. त्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अजित पवार यांनी शनिवारी पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व कार्यक्रम अचानक रद्द केले. ते मुंबईला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीला तातडीने गेल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात कालपासून जनतेच्या मनातील मुख्यमंत्री म्हणून अजित पवार समर्थक कार्यकर्त्यांनी फ्लेक्सबाजी सुरू केली. त्यामुळे मुंबईत भेटायला येण्याचा पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा निरोप अजित पवार यांना मिळाला. त्यामुळे पवार यांनी पिंपरी-चिंचवड शहरातील नियोजित कार्यक्रम रद्द केले. ते साहेबांच्या भेटीला मुंबईला रवाना झाल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
...तर शपथच घ्यायची नव्हती! - नाना पटोलेपृथ्वीराज चव्हाणांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात नाइलाजाने काम करावे लागले, या अजित पवार यांच्या वक्तव्यावर काँग्रेसकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. नाइलाज हा शब्द वापरण्यापेक्षा तुम्ही शपथ घ्यायची नव्हती, असे प्रत्युत्तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहे. तुम्ही खुर्चीवर बसून खदखद व्यक्त करण्यापेक्षा पदावर न बसता खदखद व्यक्त करायला हवी होती, असे पटोले यांनी म्हटले.
मुख्यमंत्री व्हावे, अशी इच्छा कुणाच्या मनात नसते. अजित पवार तर सर्वार्थाने अनुभवी आहेत. म्हणून ते मुख्यमंत्रीपदासाठी सक्षम आहेत. त्यांनी तशी इच्छा व्यक्त केली असेल तर माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत.- संजय राऊत, खासदार