पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवार गटाला निदर्शनाची भीती? महापालिकेला आले छावणीचे स्वरूप
By प्रकाश गायकर | Published: August 25, 2023 11:32 AM2023-08-25T11:32:15+5:302023-08-25T11:33:23+5:30
अजित पवार गटाला निदर्शने आणि आंदोलनाची भीती वाटू लागली आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे....
पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून फुटून सत्ताधारी भाजपसोबत अजित पवार यांनी सत्ता स्थापन केली. त्यानंतर ते शुक्रवारी पहिल्यांदाच पिंपरी चिंचवड महापालिकेत आले. यावेळी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच निदर्शन विरोधी पथक तैनात करण्यात आले होते. त्यामुळे पक्ष फोडून सत्तेत सहभागी झाल्यानंतर सत्ताधारी पक्षासह अजित पवार गटाला निदर्शने आणि आंदोलनाची भीती वाटू लागली आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
भाजपसोबत जात उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अजित पवार पहिल्यांदाच महापालिकेत आले. पिंपरी चिंचवड शहरातही अजितदादा गट आणि साहेब गट असा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विभागला आहे. पक्षातील आमदार, माजी नगरसेवक व पदाधिकारी यांनी अजित पवार यांना साथ दिली आहे. तर शहरातील तरुण कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्यासोबत राहणे पसंत केले आहे. पक्षात फूट पडल्यापासूनच शहरातील राजकारण देखील ढवळून निघाले आहे. त्यातच आज अजित पवार शहरात सुरू असलेल्या विकास कामाचा आढावा घेण्यासाठी महापालिकेत आले.
यावेळी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच सीआरपीएफचे जवान तैनात करण्यात आले होते. दंगल नियंत्रण पथक व निदर्शने विरोधी पथकही महापालिका आवारात तैनात करण्यात आले होते. तसेच महापालिकेचे दोन्ही प्रवेशद्वार बंद करत कर्मचाऱ्यांनाच आतमध्ये सोडले जात होते. मुख्य प्रवेशद्वारावर देखील मोठा पोलीस बंदोबस्त ठेवत प्रत्येकाची तपासणी करूनच आतमध्ये सोडले जात होते. एवढ्या मोठ्या प्रमाणावर पोलीस आणि निदर्शने विरोधी पथक नेमल्याने सत्ताधारी भाजपसह अजित पवार गटालाही निदर्शने आणि आंदोलनाची भीती वाटू लागली आहे का? अशी चर्चा महापालिका वर्तुळात रंगली आहे.