'सहा महिन्यानंतर काय होईल माहित नाही, महायुती टिकावी...';अजितदादा गटातील आमदाराचं मोठं विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2024 08:19 PM2024-04-17T20:19:25+5:302024-04-17T20:20:08+5:30
लोकसभा निवडणुकांसाठी प्रचारसभा सुरू आहेत, आज महायुतीची पिंपरी चिंडवडमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. यावेळी अजित पवार गटाचे आमदार सुनिल शेळके यांनी मोठं विधान केलं. यावरुन आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत.
Lok Sabha Election 2024 : राज्यात लोकसभा निवडणुकांसाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून प्रचारसभांचा धडाका सुरू आहे. तर दुसरीकडे महायुतीमध्ये जागावाटपावरुन रस्सीखेच सुरू असल्याचे दिसत होते. महायुतीने आतापर्यंत ४५ जागांचा तिढा सोडवला आहे. पण, अजूनही काही जागांसाठी चर्चा सुरू असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, आता यातच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील आमदार सुनिल शेळके यांच्या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. "लोकसभेनंतर विधानसभेच्या निवडणुका आहेत, यादरम्यान महायुती टिकून राहावी अशी प्रार्थना करतो", असं आमदार सुनिल शेळके यांनी विधान केलं आहे, यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत.
"निवडणूक होईल, निवडणुकीत प्रत्येकाला जबाबदारी मिळणार आहे. ज्याच्याकडे जी जबाबदारी असेल त्यांनी ती काम केली पाहिजेत. सहा महिन्यानंतर काय होईल माहित नाही, महायुती टिकावी अशी देवाकडे प्रार्थना करतोय', असं विधान आमदार सुनिल शेळके यांनी केलं. या विधानावरुन आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. शेळके म्हणाले, ही सगळी मंडळी कशी पटापटा पळतील त्याचाही विचार करतोय. ही मला चार साडेचा वर्ष झाले सापडतच नव्हती, मला बघू पळायची.आज सगळे सापडले. त्यामुळे माझा उर भरून आलाय. त्यामुळे सगळ्यांना मिठ्या मारायला पाहिजेत, असा टोलाही आमदार सुनिल शेळके यांनी लगावला.
आमदार सुनिल शेळके म्हणाले, आता जर तुमच्या गळ्यात पडायला गेलो तर गणेशभाऊ भेगडे म्हणतील तु गळ्यात पडायच्या आधी तुला कसा ढकलतील हे बघतोय पण तुम्हालाही माहित नसंल तुमच्या खाली मी सुद्धा सुरुंग लावून बसलो आहोत, असंही आमदार शेळके म्हणाले.
"कुठल्या मुहूर्तावर मी आमदार झालो हेच मला कळेना, मला मुहूर्त सांगितला तेव्हा मी फॉर्म भरुन आलो. पण, पाच वर्षाच्या आत मी जे चित्र पाहिलं आहे. असं काही अनुभवलं आहे. की पुढच्या पंचवीस वर्षात देखील असं चित्र पाहता येणार नाही. कोविडचा काळ पाहिला, सकाळचा शपथविधी पाहिला. परत महाविकास आघाडी झाली, त्यानंतर परत विरोधात जाऊन बसलो त्यानंतर महायुतीत आलो. सगळ्यांसोबत सत्तेत बसलो आणि सगळ्यांसोबत विरोधात बसलो पण, मावळच्या जनतेसाठी तिथं जावं लागेल तिथं जायची वेळ आली तरी मान अपमान पाहिला नाही, या जनतेसाठी जी भूमिका घ्यावी लागली ती भूमिका घेतली, असंही आमदार सुनिल शेळके म्हणाले.