हणमंत पाटील
पिंपरी : चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांच्या उपचारासाठी आवश्यक इंजेक्शन (औषधाची मात्रा) अमेरिकेतून आणण्याची गरज होती. त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विशेष प्रयत्न व पुढाकार घेतल्याची चर्चा आहे. राजकारणात एकमेकांच्या विरोधात असले तरी एकमेकांचा आदर व आपुलकीच्या भावनेमुळे ‘पॉलिटिक्स विथ रिस्पेक्ट’चे दर्शन पिंपरी-चिंचवडमध्ये घडले.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता असताना अजित पवार यांचे आमदार लक्ष्मण जगताप हे ऐकेकाळी विश्वासू सहकारी मानले जात. पण राजकारणात कोणी कोणाचा कायमस्वरूपी मित्र अथवा विरोधक नसतो. त्याप्रमाणे जगताप हे २०१४ च्या विधानसभा निवडणुकीवेळी भाजपसोबत गेलेे. त्यामुळे अजित पवार हे सहाजिकच नाराज झाले; परंतु हाच आपला जुना सहकारी आजारी असल्याचे वार्ता कळाल्यानंतर ते अस्वस्थ झाले. त्याला आपल्या मदतीची गरज आहे. या कारणावरून गेल्या आठवड्यातील पिंपरी-चिंचवड शहरातील प्रस्तावित सर्व कार्यक्रम त्यांनी रद्द करीत थेट रुग्णालय गाठले. लक्ष्मणराव यांच्या तब्येतीची चौकशी करून कुटुंबीयांना धीर दिला. यावेळी आमदार जगताप यांना तातडीने एका इंजेक्शनची गरज असून, त्यासाठी राज्य व केंद्र शासनाकडून तातडीने परवानगी घ्यावी लागणार असल्याचे पवार यांना समजले.
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे व खासदार सुप्रिया सुळे यांना अजित पवार यांनी संबंधित इंजेक्शन मिळवून देण्यासाठी राज्य व केंद्र सरकारकडून आवश्यक परवानगी घेण्याची विनंती केली. त्यानंतर भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व डॉ. भारती पवार यांच्याशी संपर्क करण्यात आला. त्यांच्या मदतीने अमेरिकेतून संबंधित इंजेक्शन भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला. एका बाजूला तोंडावर असलेल्या महापालिका निवडणुकीचा आखाडा रंगला असताना, नेते एकमेकांच्या मदतीला धावल्याचे पाहून या शहरातील राजकीय गोटात आदराने चर्चा रंगली आहे. राजकारणाच्या ठिकाणी राजकारण ठेवून, कोणत्याही सहकाऱ्याच्या अडचणीवेळी पक्षभेद विसरायला पाहिजे, हा संदेश अजित पवार यांनी आपल्या कृतीतून दिल्याची पिंपरी-चिंचवडच्या राजकीय गोटात चर्चा आहे.
अडचणीच्या काळात सर्व नेते पक्षभेद विसरून एकमेकांच्या मदतीसाठी धावतात
आमचे बंधू आमदार लक्ष्मण जगताप यांना धीर देण्यासाठी भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांतदादा यांचे फोन आले. राजकारण बाजूला ठेवून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विदेशातून इंजेक्शन मिळविण्यासाठी स्वत: पुढाकार घेतला. त्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व भारतीताई पवार यांनी केंद्र शासनाकडून परवानगी मिळवून दिली. अगदी मुख्यमंत्री कार्यालयातून मिलिंद नार्वेकर यांचा फोन आला होता. शिवाय शहराध्यक्ष महेश लांडगे, आजी आमदार विलास लांडे यांनीही वेळोवेळी मदत करून आम्ही कुटुंबीयांना धीर दिला. अडचणीच्या काळात सर्व नेते पक्षभेद विसरून एकमेकांच्या मदतीसाठी धावतात, याचा अनुभव आम्ही जगताप कुटुंबीय घेत आहोत असे लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांनी सांगितले.