पिंपरी : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी २०१९ ला सुलक्षणा धर यांना तिकीट द्यायला सांगितले, मात्र, ऐनवेळी त्यांनीच ते तिकीट अण्णा बनसोडेंकडे फिरवले. मागच्या वेळी त्यांनी जी चूक केली, ती यावेळी आम्ही दुरुस्त केली. आमदार बनसोडेंसारखी उद्योगी माणसे अजित पवारांना आवडतात, म्हणून त्यावेळी आमचा पक्ष अडचणीत आला, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मंगळवारी केली. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पिंपरी विधानसभा मतदारसंघातील उमेदवार सुलक्षणा शीलवंत यांच्या प्रचारार्थ आकुर्डीत सभा झाली. यावेळी पाटील बोलत होते.
जयंत पाटील म्हणाले की, महाराष्ट्रातील उद्योग बाहेर गेले. मात्र कोणीही बोलायला तयार नाहीत. महायुती सरकारमध्ये एकही मोठा प्रकल्प आला नाही. तिजोरी खाली केली आहे. महाराष्ट्राला कर्जाखाली लोटले आहे. गरिबांना जास्त कर आणि श्रीमंतांना कमी कर हे या महायुतीचे पाप आहे.
ते गेले म्हणून आमचा पक्ष स्वच्छ झाला!
जयंत पाटील म्हणाले की, कोणी पक्ष सोडला म्हणून शरद पवार यांचा पक्ष थांबला नाही. सगळे होते तेव्हा चार खासदार होते. सगळे सोडून गेले, तेव्हा आठ खासदार झाले. सगळ्यात स्वच्छ पक्ष म्हणून शरद पवारांचा पक्ष उदयास आला.
अण्णा नावाचा माणूस उद्योग करतो
जयंत पाटील म्हणाले की, शहरातील व्यावसायिकांना धमक्या येतात, हप्ते घेतले जातात. गुन्हेगारांना प्रवृत्त करून त्यांना बळ देण्याचे काम करणारा चित्रपटात ‘अण्णा’ करत असतो. तसाच अण्णा तुमच्या मतदारसंघात आहे. सगळे उद्योग तो अण्णा नावाचा माणूस करतो.
उंचीने कमी असणारी माणसे फार हुशार!
विलास लांडे म्हणाले, पिंपरीचा आमदार गडी लय हुशार. उंचीने कमी असणारी माणसे फार हुशार असतात. अजित पवार पक्षातून गेले, तेव्हा तो गडी पहिला हजर! त्या हुशार माणसाने गेल्या पाच वर्षांत पिंपरी मतदारसंघाची फार वाट लावली आहे.