"दोषींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे..."; प्रवीण गोपाळेंच्या कुटुंबीयांची अजित पवारांनी घेतली भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2023 09:26 PM2023-04-05T21:26:50+5:302023-04-05T21:30:28+5:30
पोलिस प्रशासनाने यामध्ये कुठल्याही परिस्थितीत कुणाचाही राजकीय हस्तक्षेप होऊ देता कामा नये, अशी अपेक्षा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली...
चांदखेड (पुणे) : शिरगावचे सरपंच प्रवीण गोपाळे यांची कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली. अशा प्रकारची वेळ पुन्हा कुठल्याही घरावर येऊ नये. कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. यामधील दोषींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. पोलिस प्रशासनाने यामध्ये कुठल्याही परिस्थितीत कुणाचाही राजकीय हस्तक्षेप होऊ देता कामा नये, अशी अपेक्षा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.
बुधवारी (दि. ५) पवार यांनी मयत प्रवीण गोपाळे यांच्या कुटुंबीयांची शिरगाव येथे भेट घेऊन सांत्वन केले. सांत्वन करताना अजित पवार भावुक झाले होते. यावेळी आमदार सुनील शेळके, ज्येष्ठ नेते माउली दाभाडे, बबनराव भेगडे, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, सचिन घोटकुले, संतोष मुऱ्हे, साहेबराव कारके आदी उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले, राज्यात अलीकडच्या काळात ग्रामपंचायतीच्या सरपंचांची आणि सदस्यांची बिनविरोध निवड करणे सोपे काम नाही. शहरालगतच्या ग्रामपंचायतींना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. जागांच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे सर्वांनाच वाटते की, आपण सरपंच, ग्रामपंचायतीचे सदस्य व्हावे. प्रवीणची कामाची पद्धत पाहता सर्व गावांनी आधीच ठरवले की प्रवीणला बिनविरोध सरपंच व सहकाऱ्यांना सदस्य करायचे. ही हत्या कशातून झाली? त्याच्यामध्ये ज्यांनी कुणी कृत्य केले त्यांनी संपूर्ण त्यांचे पॅनल मागे घेतले. त्याच्या रागापोटी झालाय का? आणखी कुठल्या कारणापोटी झालंय, हा तपासाचा भाग आहे. या तपासाच्या भागामध्ये पोलिस पोलिसांचे काम करतील. पोलिसांना माझे एकाच सांगणे आहे की, कुठल्याही परिस्थितीत त्यांनी कुणाचाच राजकीय हस्तक्षेप होऊ देता कामा नये. अशा दुर्दैवी घटना घडतात, याची पारदर्शकपणे चौकशी झाली पाहिजे.
पोलिस प्रशासनाच्या वरिष्ठांशी मी स्वत: बोललो आहे. या हत्या प्रकरणात मी जातीने लक्ष घालणार आहे. कोणत्याही परिस्थितीत प्रवीण गोपाळे यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देणारच, असेही अजित पवार म्हणाले.