राज्यात एकच मंत्री, उपमुख्यमंत्री बिनखात्याचेच; अजित पवारांची राज्य सरकारवर बोचरी टीका
By नारायण बडगुजर | Published: August 6, 2022 07:51 PM2022-08-06T19:51:46+5:302022-08-06T19:53:49+5:30
युती, आघाडीचा निर्णय राजकीय परिस्थितीनुसार....
पिंपरी : गेल्या एक महिन्यापासून राज्यामध्ये अवघ्या एका व्यक्तीचं मंत्रीमंडळ आहे. मुख्यमंत्री एकटे आणि त्यांच्या जोडीला देवेंद्र फडणवीस आहेत. असे असले तरी त्यांना खातेवाटप झालेले नाही. त्यामुळे फडणवीस बिनखात्याचे उपमुख्यमंत्री आहेत, असा टोला लगावत विधानसभेचे विरोधी पथनेते अजित पवार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.
पिंपरी-चिंचवड शहरातील राष्ट्रवादी काॅंग्रेसतर्फे ‘निर्धार महाविजयाचा संवाद कार्यकर्त्यांचा’ ही संवाद सभा चिंचवड येथे झाली. त्यावेळी अजित पवार बोलत होते. पवार म्हणाले, निवडणुका घेण्याबाबत न्यायालयाने सांगितले आहे. तरीही राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ दिल्या जात नाहीत. महापालिकेची प्रभागरचना, जिल्हा परिषदेची गट रचना बदलून सदस्य संख्या कमी केली. तुम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री होता पण, बाकीच्यांना मात्र प्रतिनिधित्व द्यायचे नाही, असे सुरू आहे. यातून लोकशाहीचा खून केला, मुडदा पाडला. लोकांच्यातून नगराध्यक्ष निवडून आणला जाणार आहे. मग तसा महापौर, मुख्यमंत्री आणि पंतप्रधान देखील थेट लोकांमधून निवडून आणा. इतरांसाठी एक न्याय आणि तुमच्यासाठी दुसरा न्याय, हे कसे चालेल? लोक आता गप्प आहेत. मात्र, संधी मिळाल्यावर कुठलं बटण दाबतील हे कळणार नाही. मनामध्ये आल्यास जनता कुणालाही उलथवून टाकू शकते.
मुख्यमंत्र्यांचे अधिकार चिफ सेक्रेटरीला द्या
मंत्रीमंडळ विस्तार न झाल्याने प्रशासनातील अधिकाऱ्यांना अधिकार देण्यात आले. मग राज्याचे अधिकारही चिफ सेक्रेटरीला द्यावेत आणि मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी घरी बसावे. मंत्रीमंडळ लवकरच होणार, असे सांगितले जाते. मात्र, ते कधी येणार हे सांगत नाहीत. त्यात काय अडचणी आहेत ते सांगितले पाहिजे. दिल्लीतून सिग्नल मिळत नसेल तर तेही सांगावे. शिवसेनेतून बाहेर पडलेल्या आमदारांना मंत्री, राज्यमंत्री तसेच महामंडळाच्या अध्यक्ष पदाचे असे म्हणत अजित पवार यांनी टिका केली.
युती, आघाडीचा निर्णय राजकीय परिस्थितीनुसार
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी कोणत्या पक्षासोबत युती किंवा आघाडी करायची याबाबत त्यावेळच्या राजकीय परिस्थितीनुसार निर्णय घेण्यात येईल. शक्यतोवर पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना त्याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार देण्यात येईल, असे अजित पवार यांनी सांगितले.
त्यांना सद्बुध्दी मिळो...
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या दिल्लीच्या फेऱ्या वाढल्या आहेत. सर्वांच्याच नजरा त्यांच्याकडे लागल्या आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना सद्बुध्दी मिळून मंत्रीमंडळ विस्तार होईल, अशी अपेक्षा असल्याचे पवार म्हणाले.