'मतावर नाही, तर वेळेवर उमेदवार ठरतो...' राहुल कलाटे यांच्याविषयी अजितदादा स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2023 12:51 PM2023-02-08T12:51:00+5:302023-02-08T12:51:40+5:30
राहुल कलाटे यांची बंडखोरी टाळण्यासाठी त्याचे मनपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करणार
पिंपरी : ‘पोटनिवडणुकीतील चिंचवड जागेसाठी उमेदवार कोण यासाठी मी शेवटपर्यंत चर्चा केली. वेगवेगळे पर्याय दिले; पण एकमत झाले नाही. मंगळवारी सकाळी पुन्हा सर्वांशी बोललो. त्यानंतर नाना काटे यांच्या नावावर एकमत झाले. तरीही राहुल कलाटे उभे राहिले तर आमचा अजूनही एकमत करण्याचा प्रयत्न आहे. त्यांच्याशी बोलून त्यांचे मनपरिवर्तन करण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न असेल. तसेच २०१९ ला किती मते मिळाली, यावर उमेदवार ठरत नाही, परिस्थितीनुसार मते प्रत्येक वेळी बदलत असतात, असे मत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केले.
चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या वतीने मंगळवारी नाना काटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार, आमदार अण्णा बनसोडे, सुनील शेळके, माजी आमदार विलास लांडे, शहराध्यक्ष अजित गव्हाणे, महिला अध्यक्षा कविता आल्हाट, आदी उपस्थित होते.
कसबा आणि चिंचवड या दोन विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक लागली आहे. त्यासाठी महाविकास आघाडीने लढण्याचे निश्चित केले. त्यानंतर चिंचवडमध्ये कोणी लढायचे यासाठी मी शेवटच्या दिवशीपर्यंत चर्चा केली. वेगवेगळे पर्याय दिले; पण एकमत झाले नाही. अखेर मंगळवारी (दि. ७) सकाळी सर्वांशी बोललो. त्यानंतर नाना काटे यांच्या नावावर एकमत झाले. राहुल कलाटे यांची बंडखोरी टाळण्यासाठी त्याचे मनपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करणार आहे, असे अजित पवार यांनी सांगितले.