चांदखेड : कासारसाई धरणामध्ये मत्स्यव्यवसाय प्रकल्पला भेट देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आले होते. ते ज्या तराफ्यात बसले होते तो तराफा अधिकच्या वजनाने बंद पडल्याने अजित पवार पाण्यात मधोमध अडकून पडले. त्यानंतर दुसऱ्या बोटीच्या सहाय्याने पवारांनी प्रकल्पाची पाहणी केली.
कासारसाई धरणामध्ये वेदिका फार्म म्हणून आधुनिक पध्दतीने मत्स्यव्यवसाय केला जातो. त्याची पाहणी करण्यासाठी अजित पवार शुक्रवारी (दि. ८) पहाटे सहा वाजता कासारसाई धरणावर आले होते. मत्स्यव्यवसायसाठी धरणाच्या मध्यभागी प्रकल्पाची उभारणी करण्यात आलेली आहे. तेथे जाण्यासाठी तराफा तसेच बोटीने जावे लागते, परंतु संबधित मालकाने तराफ्याने जाण्याचे नियोजन केले.
तराफ्यामध्ये आधिकची गर्दी करु नका म्हणून अजित पवारांनी तंबी दिली होती. परंतु पवार तराफ्यावर बसले आणि त्यानंतर मागून अधिकच्या काहींनी गर्दी केली. परिणामी जास्त गर्दीमुळे तराफ्याचे इंजिन बंद पडले. चालकाने इंजिन सुरु करण्याचे अनेक प्रयत्न केले, परंतु ते सुरु झाले नाही. शेवटी लगतची बोट जवळ घेण्यात आली त्यानंतर पुढचा प्रवास करुन त्यांनी प्रकल्पाची माहिती घेतली.