अजित पवार समर्थक संजोग वाघेरे पाटील ‘मातोश्री’वर, पिंपरी-चिंचवडच्या राजकीय वर्तुळात खळबळ

By नारायण बडगुजर | Published: December 25, 2023 06:31 PM2023-12-25T18:31:17+5:302023-12-25T18:31:52+5:30

माजी महापौर संजोग वाघेरे पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष आहेत...

Ajit Pawar supporter Sanjog Vaghere Patil on 'Matoshree', stir in political circles of Pimpri-Chinchwad | अजित पवार समर्थक संजोग वाघेरे पाटील ‘मातोश्री’वर, पिंपरी-चिंचवडच्या राजकीय वर्तुळात खळबळ

अजित पवार समर्थक संजोग वाघेरे पाटील ‘मातोश्री’वर, पिंपरी-चिंचवडच्या राजकीय वर्तुळात खळबळ

पिंपरी : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे समर्थक असलेले राष्ट्रवादी काॅंग्रेसचे पिंपरी-चिंचवड शहरातील नेता संजोग वाघेरे पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सोमवारी मुंबई येथे ‘मातोश्री’वर भेट घेतली. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

माजी महापौर संजोग वाघेरे पाटील हे राष्ट्रवादी काॅंग्रेसचे माजी शहराध्यक्ष आहेत. अजित पवार यांचे विश्वासू म्हणून ओळख असलेले संजोग वाघेरे पाटील यांनी मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास तीव्र इच्छुक आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीतही त्यांनी इच्छुक असल्याचे जाहीर केले होते. मात्र, त्यावेळी राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यानंतरही संजोग वाघेरे पाटील यांनी निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचे वेळोवेळी जाहीर कार्यक्रमांतून सांगितले.

दरम्यान, अजित पवार यांनी सोमवारी शिरुर लोकसभा मतदारसंघ त्यांच्याच गटाकडे असणार असल्याचे सांगितले. त्यामुळे मावळ लोकसभा मतदासंघ शिवसेनेच्या ठाकरे गटाकडे जाणार असल्याची चर्चा आहे. त्याच अनुषंगाने संजोग वाघेरे पाटील यांनी थेट मातोश्री गाठत उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. मावळ लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचे त्यांनी उद्धव ठाकरे यांना सांगितले. शिवसेना नेता संजय राऊत, सचिन अहिर, आदित्य ठाकरे यांच्यासह पिंपरी-चिंचवड शहरातील पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

भाजपचा मोठा चेहरा ‘मातोश्री’च्या संपर्कात?

मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक असलेला भाजपचा पिंपरी-चिंचवड शहरातील मोठा नेता आणि राष्ट्रवादीतील आणखी एक नेता असे तीन जण शिवसेनेच्या (ठाकरे गट) संपर्कात आहे. संजोग वाघेरे पाटील यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी प्राथमिक चर्चा केली. मात्र, संजोग वाघेरे पाटील यांनी पक्षप्रवेश केला नाही, असे शिवसेनेचे (ठाकरे गट) पिंपरी-चिंचवड शहर प्रमुख ॲड. सचिन भोसले यांनी सांगितले.

‘मातोश्री’वर उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. मावळ लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेच्या वाट्याला जाणार असल्याचे दिसून येते. त्या अनुषंगाने त्यांच्याशी चर्चा केली. गेल्या दोन टर्मपासून मी मावळ लोकसभा मतदारसंघातून तीव्र इच्छुक आहे. मला जबाबदारी दिली तर मी निश्चितच पार पाडेल, असे त्यांना सांगितले. कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून कळवतो, असे उद्धव ठाकरे यांनी मला सांगितले आहे.

- संजोग वाघेरे पाटील

लोकशाहीमध्ये प्रत्येकाला एकमेकांना भेटण्याचा अधिकार आहे. त्यासाठी वाघेरे भेटायला गेले असतील. मला त्याबाबत माहिती नाही. मात्र काहीजण म्हणत आहेत की ते लोकसभा लढवण्यासाठी जाणार आहेत. महाविकास आघाडीला उमेदवार नाही म्हणून इकडचा तिकडचा उमेदवार घेण्याची धडपड सुरू आहे.

- अजित पवार, उपमुख्यमंत्री

Web Title: Ajit Pawar supporter Sanjog Vaghere Patil on 'Matoshree', stir in political circles of Pimpri-Chinchwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.