पिंपरी : भाऊ ओवाळणी देतो, ती ओवाळणी परत घ्यायची नसते. पैसे परत घेण्याचा भाषा कोणी करत असेल, तर जीभ हसडून काढील, असा सज्जड इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरीत दिला. 'कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. काही लोक बोलतात. त्याचा फटका कार्यकर्त्यांना बसतो. विधानसभेला कोणतीही गडबड करायची नाही, शहरातील तिन्ही जागांपैकी महायुतीने दिलेल्या उमेदवाराचेच काम करायचे आहे, असेही पदाधिकाऱ्यांना पवार यांनी निक्षून सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) च्या वतीने आयोजित केलेल्या जन सन्मान यात्रा पिंपरीमध्ये आली. एच ए. मैदानावर झालेल्या सभेत पवार बोलत होते. व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, युवा नेते पार्थ पवार, आमदार अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, माजी महापौर मंगला कदम, योगेश बहल, सुरज चव्हाण, ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर, नाना काटे, महिला कविता आल्हाट आदी उपस्थित होते.
मी संविधानाला हात लावू देणार नाही
अजित पवार म्हणाले, "शहराशी माझे वेगळे नाते आहे. मला पहिल्यांदा खासदार म्हणून ओळख याच शहराने दिली. लोकसभेला आरक्षण आणि संविधान बदलणार असा खोटं पण रेटून बोल असा प्रचार केला. पण, मी संविधानाला हात लावू देणार नाही."
सावत्र भावापासून लांब रहा!
'गेल्या काही कालखंडापासून सरकारच्या विविध योजना या चूनावी जुमला आहे, अशी टीका विरोधकांकडून केली जाते. विरोध करायचा म्हणून टीका करणे योग्य नाही. आजपर्यंत ९० लाख महिलांना ३ हजार रूपये पाठवले आहेत. मी तुमचा भाऊ आहे. त्यामुळे सावत्र भावापासून लांब रहा. उद्यापर्यंत १ कोटी २५ लाख महिलांना मदत मिळणार आहे. हे सरकार असेपर्यंत ६-७ हजार रूपये महिलांना मिळतील. खरे तर, आर्थिक शिस्त लावणार मी कार्यकर्ता आहे. आर्थिक घडी बसवायची आहे. खूप विचारपूर्वक योजना आणल्या आहेत. सरकार आले तर योजना सुरू राहतील. लाभ देतोय, लाभाच्या माध्यमातून बळ देतोय. पुढील ६० महिन्याच्या कालावधीत ९० हजार रूपये देणार आहे. ७.५० हार्स पॉवरपर्यंत मोफत वीज देण्यात येणार आहे. मागच्या लाईटबीलचें टेन्शन घेऊ नका. कोणी लाइट कट करणार नाही, हा अजित पवारचा वादा आहे, असेही अजित पवारांनी म्हटलं.
कार्यकर्त्यांच्या मनातील उमेदवार देऊ
'पिंपरी- चिंचवड शहरात झोपडपट्टी निर्मूलन योजना राबवू, भाटनगर परिसरातील प्रश्न सोडविण्यासाठी आयुक्ताना आदेश दिले होतील. जागा वाटपाबाबत महायुतीचे नेते निर्णय घेतील. आम्ही शहरात एकत्र बसून आपल्याशी चर्चा करू. कार्यकर्त्यांच्या मनातील उमेदवार देवू, असेही पवार यांनी स्पष्ट केले.