लोकमत न्यूज नेटवर्क, पिंपरी : विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपसोबत येतील याबाबत चर्चा सुरू आहे. मात्र, अजित पवार आले तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपसोबत येईल असे वाटत नाही, असे सूचक विधान शिवसेना उपनेते तथा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी गुरुवारी (दि.५) पिंपरीत केले.
भोसरी विधानसभेतील विविध प्रश्नांबाबत पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांची भेट घेण्यासाठी आले असताना ते पत्रकारांशी बोलत होते. या प्रसंगी शिवसेना पदाधिकारी इरफान सय्यद, बाळासाहेब वाल्हेकर, दत्तात्रय भालेराव आदी उपस्थित होते. ते पुढे म्हणाले की, डॉ. अमोल कोल्हे भाजपमध्ये येतील की नाही माहित नाही. परंतु, ते भाजपमध्ये आले, तर चांगली गोष्ट आहे. शिवसेना-भाजप युती वाढावी, अशीच आमची भूमिका आहे. अजित पवार देखील भाजपसोबत आले तर चांगली गोष्ट आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष येईल की नाही ते सांगता येत नाही. तसेच भाजप-राष्ट्रवादी एकत्र येईल असे दिसत नाही. परंतु, ते एकत्र आल्यानंतर देखील शिवसेनेवर कोणताही परिणाम होणार नाही. भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले. तर, चांगले होईल. तीनही पक्ष एकत्र आले तर त्याचा आम्हाला आनंद होईल, असेही आढळराव पाटील यांनी सांगितले.मे अखेर चिखली जलशुध्दीकरण केंद्र सुरू करू
चिखली येथील जलशुध्दीकरण केंद्राचे काम पूर्ण झाल्यानंतर उद्घाटन झालेले नाही. या केंद्राचे उद्घाटन करून मे महिन्यात नागरिकांना पाणीपुरवठा करण्यात येईल, त्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करू, असे आढळराव पाटील यांनी यावेळी सांगितले. तसेच, भामा आसखेड प्रकल्प, चिखली, मोशीतील पाण्याचा प्रश्न, अनधिकृत होर्डिंग्ज, नदी सुधार, अग्निशमन केंद्र, मोशीतील प्रस्तावित रुग्णालय, शिक्षणविषय प्रश्नांबाबत आयुक्तांशी चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.