पुणे : पुणे जिल्ह्यातील कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या ठिकाणी निवडणुका बिनविरोध होणार की थेट निवडणूक होणार याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. या निवडणुका बिनविरोध होण्याची शक्यता कमी दिसतेय. कारण विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पुण्यात महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, मविआतील इतर घटकपक्षांची आणि नेत्यांची निवडणूक कसबा आणि चिंचवडमध्ये लढवण्याची इच्छा आहे. यावर आता सोमवार-मंगळवारी मुंबईत बसून महाविकास आघाडी चिंचवड आणि कसबा विधानसभा पोटनिवडणुकीबाबत चर्चा करणार आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी बु. चा पुरस्कार वितरण कार्यक्रमावेळी पवारांनी माध्यमांशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली.
कसबा आणि चिंचवड मतदार संघासाठी महाविकास आघाडी निवडणूक लढवेलच मात्र ज्यांची ताकद थोडी जास्त आहे त्यांनी इतरांना पाठिंबा द्यावा, असं वक्तव्य अजित पवार यांनी केले. त्यामुळे अजित पवार यांनी अप्रत्यक्ष कसबा आणि चिंचवड मतदार संघावर दावा केल्याचे दिसत आहे. यावर आता शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि काँग्रेसकडून कोणती प्रतिक्रिया येते ते महत्त्वाचे आहे.
दुसरीकडे पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते निवडणूक लढविण्यावर ठाम आहेत. पिंपरीतील बैठकीत स्थानिक नेते आक्रमक झाले होते. कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादीने पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवावी, अशी मागणीचा ठराव करून पक्षाला पाठविला आहे.
चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे नुकतेच निधन झाले. त्यामुळे पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरीत बैठक झाली होती. यावेळी शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी महापौर संजोग वाघेरे, महिला शहराध्यक्ष कविता आल्हाट, युवकचे शहराध्यक्ष इम्रान शेख, विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर, नाना काटे, श्याम लांडे, मयूर कलाटे, विनोद नढे, पंकज भालेकर, माया बारणे, संगीता ताम्हाणे, राजेंद्र जगताप, अरुण बोऱ्हार्हाडे, गोरक्ष लोखंडे, राजू लोखंडे, विनायक रणसुभे, फझल शेख, नारायण बहिरवडे उपस्थित होते.