अजित पवारांच्या ‘राष्ट्रवादी’ला बालेकिल्ल्यात खिंडार
By ज्ञानेश्वर भंडारे | Published: July 3, 2024 10:00 PM2024-07-03T22:00:32+5:302024-07-03T22:01:21+5:30
विधानसभा अध्यक्ष आणि माजी शहर युवक अध्यक्षांची घरवापसी
पिंपरी : लोकसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर बालेकिल्ला असलेल्या पिंपरी-चिंचवडमधील माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. अजित पवार गटाचे पिंपरी-चिंचवडचे विधानसभा अध्यक्ष आणि माजी शहर युवक अध्यक्षांनी राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का देत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला.
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तसेच माजी शहर युवक अध्यक्ष विशाल वाकडकर आणि पिंपरी-चिंचवड विधानसभा अध्यक्ष विशाल काळभोर यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात कार्यकर्त्यांसह प्रवेश केला. मुंबईत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. तत्पूर्वी मुंबईत या दोन्ही पदाधिकाऱ्यांनी जयंत पाटील यांच्यासमेवत चर्चा केली होती.
विशाल वाकडकर यांची मे २०२२ मध्ये म्हणजेच राष्ट्रवादी पक्ष एकच असताना राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाली होती. त्यावेळी, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हेच होते. मात्र, राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर वाकडकर हे अजित पवारांसमवेत गेले होते. आता, लोकसभा निवडणुकांनंतर आगामी विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी आणि राजकीय वातावरण लक्षात घेत वाकडकर यांनी पुन्हा एकदा शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत राहून तुतारी वाजवण्याचे ठरवले आहे. त्यानुसार, मुंबईतील राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात पिंपरी-चिंचवडमधील दोन्ही नेत्यांचा पक्षप्रवेश झाला. अजित पवारांसाठी बालेकिल्ला असलेल्या पिंपरी चिंचवडमध्येच राष्ट्रवादीला खिंडार पडल्याने आगामी विधानसभा निवडणुकांपर्यंत काय-काय होईल, याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
पंधरा वर्षे शहराचे अजित पवारांचं ‘दादा’
पिंपरी-चिंचवड अजित पवारांचा बालेकिल्ला होता. सलग १५ वर्षे तेच शहराचे ‘दादा’ होते. परंतु, २०१७ मध्ये राष्ट्रवादीतून भाजपत गेलेल्या दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे यांनी अजितदादांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावला. महापालिकेवर भाजपची एकहाती सत्ता आणली. मात्र, जुलै २०२३ मध्ये पक्षातील फुटीनंतर दोन्ही गटांनी बालेकिल्ला पुन्हा ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले. शहरात लक्ष घातले. परंतु, लोकसभा निवडणुकीनंतर राजकीय वारे बदलले. महाविकास आघाडीच्या बाजूने जनमत असल्याचे दिसल्याने अजितदादांच्या राष्ट्रवादीतील कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांमध्ये चलबिचल सुरू झाली. अन् अजित पवार गटाला शहरात गळती लागल्याचे चित्र आहे.