Pimpari Chinchwad ( Marathi News ) : राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर पक्षाच्या बहुतांश पदाधिकाऱ्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत जाणं पसंत केलं होतं. मात्र लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर वारे उलट्या दिशेने वाहण्यास सुरुवात झाली असून अजित पवारांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवडमध्ये मोठी पडझड होण्याची शक्यता आहे. कारण १५ ते २० नगरसेवकांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर आज पिंपरी चिंचवडचे माजी महापौर आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आझम पानसरे यांनीही शरद पवार यांची भेट घेतली आहे.
शरद पवार यांच्यासोबतच्या आजच्या भेटीत आझम पानसरे यांनी शहरातील राजकीय स्थितीबाबत चर्चा केली. तसंच २० जुलै रोजी शरद पवार यांच्या पिंपरी चिंचवड इथं होणाऱ्या मेळाव्याच्या नियोजनाबाबतही चर्चा झाली. या मेळाव्यातच १६ माजी नगरसेवकांसह आझम पानसरे हेदेखील शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करतील, अशी माहिती आहे. त्यामुळे आगामी विधानसभा आणि महापालिका निवडणुकांपूर्वी अजित पवारांसाठी हा मोठा धक्का असणार आहे.
पिंपरी चिंचवडमधील राजकीय समीकरणे बदलणार
पिंपरी-चिंचवड अजित पवारांचा बालेकिल्ला होता. मात्र, जुलै २०२३ मध्ये अजित पवारच शिवसेना-भाजप सरकारमध्ये सहभागी झाले आणि राष्ट्रवादीचे दोन गट पडले. पक्षातील फुटीनंतर शहरातील संघटना, आमदार, सर्व माजी नगरसेवक अजित पवारांसोबत कायम राहिले. केवळ दोन माजी नगरसेवक शरद पवार यांच्याबरोबर राहिले. मात्र, लोकसभा निवडणुकीनंतर चित्र बदलले आहे. आता इनकमिंग सुरू झाली आहे. अजित पवार गटाचे युवकचे प्रदेश पदाधिकारी विशाल वाकडकर, पिंपरी विधानसभा अध्यक्ष विशाल काळभाेर यांनी शरद पवार गटात प्रवेश केला आहे.
पक्षातील फुटीनंतर दोन्ही गटांनी बालेकिल्ला पुन्हा ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले. शहरात लक्ष घातले. परंतु, लोकसभा निवडणुकीनंतर राजकीय वारे बदलले. महाविकास आघाडीच्या बाजूने जनमत असल्याचे दिसल्याने अजितदादांच्या राष्ट्रवादीतील कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांमध्ये चलबिचल सुरू झाली. तर बडे नगरसेवक आले तर आपला महापालिका निवडणुकीत पत्ता कट होईल, या भीतीने निष्ठावंतांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.