चिंचवड : आकुर्डी-चिंचवडगाव रस्त्यावर जयगणेश व्हिजन कॉम्प्लेक्स समोर मनमानी पद्धतीने पार्क केलेल्या गाड्यांवर वाहतूक शाखेने काल (मंगळवार, दि. १२) कारवाईचा बडगा उगारला. मात्र आज येथील परिस्थिती 'जैसे थे' असल्याने वाहतूक शाखेची कारवाई म्हणजे फक्त दिखावाच असल्याची चर्चा परिसरात सुरू होती.निगडी वाहतूक शाखेच्या वतीने रस्त्यात अडथळा करणाऱ्या पंधरा गाड्यांवर कारवाई केली. अनेक महिन्यांपासून या भागात मुख्य रस्त्यावर व्यावसायिक वाहने उभी केली जात आहेत. दुतर्फा रस्त्यावर अनेक व्यावसायिक वाहने पार्क करण्यात येत असल्याने वाहतूक समस्या गंभीर झाली आहे. या बाबत स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रारी केल्या होत्या. वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी या बाबत ठोस उपाय योजना केल्या नसल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. मनमानी पद्धतीने व्यावसायिक वाहने उभी केली जात असल्याने या मुख्य रस्त्यावर अपघाताच्या घटना नियमित होत आहेत. येथील तक्रारीची दखल घेत काल वाहतूक शाखेने वाहनांना जॅमर लावले. मागील महिन्यात पालिका प्रशासन व वाहतूक शाखेने संयुक्त कारवाई केली होती. मात्र या भागातील पार्किंग समस्या आजही सुटलेली नाही.या भागात खासगी व्यावसाय करणारी वाहने पार्क केली जातात. या बाबत स्थानिक नगरसेवकांनी पालिका सभागृहात विषय मांडला होता. मात्र या बाबत पालिका प्रशासन व वाहतूक शाखा ठोस कारवाई करत नसल्याने येथील प्रश्न सुटत नाही. येथील कारवाई करण्याबाबत राजकीय दबाव आल्याची चर्चा आता नागरिक करत आहेत. नागरिकांच्या व वाहचालकांच्या समस्या कायम स्वरुपी सोडविण्यासाठी योग्य कारवाई करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.
गुन्हे दाखल करायला हवेतआकुर्डी-चिंचवड गाव मार्गावर व्यावसायिक वाहने उभी केल्याने याचा त्रास नागरिकांना होत आहे. अनेक तक्रारी नागरिक करत आहेत. या बाबत योग्य कारवाई व्हावी या साठी पालिका सभागृहात विषय मांडला आहे. पालिका प्रशासनाने वाहतूक शाखेला बरोबर घेऊन मोठ्या दंडात्मक स्वरूपाची कारवाई करणे गरजेचे आहे. तसे अधिकार पालिका प्रशासनाकडे आहेत. मात्र राजकीय वरदहस्त असल्याने या भागात ठोस कारवाई केली जात नाही. यामुळे अपघाताचे प्रकार वाढले आहेत. मनमानी पद्धतीने पार्किंग करणाऱ्या या व्यावसायिकांवर गुन्हे दाखल करायला हवेत.- प्रमोद कुटे, नगरसेवक