आळंदी : ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, तुकाराम महाराजांचा जयघोष,हरिपाठ, अभंग, भजनाचा गजर, खांद्यावर भगवी पताका, तुळशीमाळ, टाळ आणि गळ्यात वीणा घेत अशा नादमय आणि भक्तिमय वातावरणात माऊलींची आळंदी नगरी दुमदुमुन गेली. शुक्रवारी ज्ञानेश्वरमहाराज यांच्या पालखीचे आळंदी मंदिरातून प्रस्थान होत आहे. यानिमित्त आळंदीत राज्यभरातून लाखो भाविक दाखल झाले आहेत.तीर्थक्षेत्रातील रस्ते गर्दीने व्यापले आहेत. पहिला मुक्काम जुन्या गांधी वाड्याच्या जागेतल्या देवस्थानचे आजोळघरी समाज आरतीने विसावणार आहे. रात्री जागर आणि मुक्काम पाहुणचाराने सोहळा शनिवारी भल्या पहाटे पुण्याकडे मार्गस्थ होईल. या प्रस्थान सोहळ्याची मंदिरासह आळंदीत जय्यतपणे तयारी सुरु झाली आहे. मंदिराचे प्रमुख विश्वस्त अभय टिळक, पालखी सोहळा प्रमुख विकास ढगे पाटील, पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर, व्यवस्थापक माऊली वीर यांनी मंदिरात प्रस्थान सोहळ्याची तयारी पूर्ण केली आहे. नगर परिषदेच्या वतीने नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, उपनगराध्यक्ष सागर भोसले, यात्रा समितीसभापती पारुबाई तापकीर यांचे मार्गदर्शक सूचनांप्रमाणे आळंदीत येणाऱ्या भाविकांना नागरी सेवा सुविधा देण्यात येत आहेत. यासाठी मुख्याधिकारी समीर भूमकर यांनी यात्राकाळात नागरी सुविधांमुळे गैरसोय होणार नाही याची दक्षता घेतल्याचे सांगितले.- आळंदी, देहू परिसर विकास समितीच्या वतीने इंद्रायणी नदीघाटावर लक्षवेधी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. नदी घाटावर लोकशिक्षणाचा उपक्रम डॉ. विश्वनाथ कराड यांच्या माध्यमातून सुरु झाला आहे. कीर्तन, प्रवचन, भजन, जागर, घंटानाद लोकशिक्षणपर उपक्रम राबविले जात आहेत. यास भाविकांची गर्दी होत आहे. आळंदी देवस्थानची दर्शनबारी कमी पडत असल्याने दर्शनाची रांग भक्तिसोपान पुलावरून आणली आहे. भाविक रांगांमध्ये उभे राहून श्रींच्या दर्शनास गर्दी करीत आहेत. नगरप्रदक्षिणा प्रदक्षिणा मार्ग प्रशस्त झाले आहेत. यावर्षी सुमारे ८० टक्के काम पूर्ण झाल्याने प्रदक्षिणा मार्ग प्रशस्त झाला आहे. मार्गांवर खड्डे नसल्याने भाविकांत समाधान व्यक्त होत आहे.
आळंदीत वैष्णवांची मांदियाळी, सोहळ्याचे आज प्रस्थान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2018 4:09 AM