लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : हॉटेल, परमिट रूममध्ये बसून मद्य पिणे महागडे ठरते, त्यावर मद्यपींनी पर्याय शोधला आहे. स्वत:च्या मोटारीत बसून मद्याचे पेग रिचवीत शहरातील अंतर्गत रस्त्यांवर फेरफटका मारायचा. असे प्रकार शहरात निदर्शनास येऊ लागले आहेत. कोकणे चौक ते कासारवाडी, चिखली-स्पाईन रस्ता, भक्ती शक्ती चौक ते मुकाई चौक, रावेत, मोशी या मार्गावर रात्रीच्या वेळी हे चित्र पहावयास मिळते. अशा मद्यपींच्या वाहनांमुळे अपघात घडत आहेत, अशा वाहनांची तपासणी मोहीम राबवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. शिक्षणासाठी आलेले महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे ग्रुप मोटारीत बसून अशाच प्रकारे पार्ट्या करतात. रावेत येथील रस्त्याच्या बाजूला सायंकाळी आडबाजूला मोटारी उभ्या केल्या जातात. मोटारीत बसून तरुण मद्यपान, तसेच धूम्रपान करतात. सिगारेटचे झुरके घेत असताना, मोटारीच्या खिडक्यांमधून धूर बाहेर पडत असल्याचे दिसून येते. काळ्या काचा लावलेल्या मोटारींचा असा दुरुपयोग होत आहे. निगडीतील भक्ती-शक्ती चौकात मागील बाजूस अशाच प्रकारे वाहनांमध्ये पार्ट्या सुरू असतात. वाहनांमध्ये खुलेआम मद्यपान करणाऱ्यांमुळे अपघात घडतात. काळभोरनगर येथे एका मोटारीने दुचाकीवरील महिलेला उडविले. दुपारी १२च्या सुमारास ही घटना घडली. पंचनामा करण्यासाठी घटनास्थळी पोलीस आले. त्यांनी, आजुबाजूच्या लोकांनी जे दृष्य पाहिले ते शहरात चुकीचे प्रकार कसे राजरोसपणे घडतात, याचे ज्वलंत उदाहरण होते. पोलिसांनी अशा वाहनांची चौकशी करणे गरजेचे आहे.
चालत्या मोटारीत मद्यपींचे अड्डे
By admin | Published: May 13, 2017 4:41 AM