पिंपरी :राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना दरमहा १०० कोटी रुपयांचे टार्गेट दिले होते, असे पत्र मुख्यमंत्र्यांना देण्यात आल्याचे समोर आले. या 'लेटरबॉम्ब'मुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.
पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलातील एका कर्मचाऱ्याने गेल्या वर्षी अशाच पद्धतीने पत्र दिल्याचे समोर आले होते. कोट्यवधी रुपयांच्या हप्ता वसुलीचा उल्लेख त्या पत्रात करण्यात आला होता. मुंबईतही अशाच पद्धतीने लेटरबॉम्ब झाल्याने पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलात खळबळ उडवून देणाऱ्या ‘त्या’ पत्राबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी महत्वपूर्ण उत्तर दिले.
पिंपरी चिंचवड येथे पोलीस आयुक्तालयात सोमवारी (दि. २२) पत्रकार परिषद झाली. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. कृष्ण प्रकाश म्हणाले, राज्याचा गृहमंत्री सहायक निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याला १०० कोटींच्या वसुलीचे टार्गेट देईल, हे मनाला पटत नाही. चुकीचे काम करणाऱ्यांनाच टार्गेट दिले जाते. पिंपरी -चिंचवड शहराला भयमुक्त करणे, हेच आमचे टार्गेट आहे.
समाजात काही लोक चुकीची कामे करतात. अशाच व्यक्तींना असे टार्गेट दिले जाते. सहायक निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याला पोलीस आयुक्ताच्या परवागीशिवाय असे टार्गेट दिले जाऊ शकत नाही, असे माझे वैयक्तिक मत आहे. त्यामुळे गृहमंत्री देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे वाटते, असे म्हणून त्यांनी एकप्रकारे देशमुख यांची पाठराखण केल्याचे दिसून आले.
पिंपरी -चिंचवड शहर भयमुक्त करणे, हेच आमचे टार्गेट आहे. पिंपरी -चिंचवड शहरातील अवैध धंद्यांतून वसुलीबाबतचे पत्र व्हायरल झाले. त्याचा तपास ‘सीआयडी’कडे आहे. त्यामुळे मी त्यावर भाष्य करणार नाही, असेही कृष्णप्रकाश यांनी स्पष्ट केले.
‘पोलिसांचा संबंध गुन्हेगारांशी, त्यांच्या राजकीय पक्षाशी नाही’
शहरात कोणाचीही दादागिरी पोलीस खपवून घेणार नाहीत. गुन्हेगार हा कोणत्याही राजकीय पक्षाचा पदाधिकारी, कार्यकर्ता किंवा समर्थक असला तरी पोलिसांचा त्याच्याशी संबंध नाही. कारण संबंधित गुन्हेगार हा पोलिसांसाठी फक्तच गुन्हेगारच असतो. त्यामुळे गुन्हेगार कोणीही असो, त्याच्या चुकीला माफी नाही, असा इशाराही कृष्ण प्रकाश यांनी दिला.