पिंपरी : पिंपरी-चिंचवडच्या २० लाख लोकसंख्या असलेल्या शहरात वैद्यकीय सेवा पुरविणा-या महापालिकेकडे अवघ्या ११ रुग्णवाहिका आहेत. रस्त्यावर एक ते दोनच धावताना दिसून येतात, अन्य रुग्णवाहिका वायसीएमच्या आवारातच उभ्या असल्याचे दृश्य नित्याचेच आहे. अनेकदा या रुग्णवाहिकांचा उपयोग शववाहिका म्हणून केला जातो.महापालिकेचे यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालय हे साडेसहाशे खाटांची क्षमता असलेले रुग्णालय आहे. रुग्णांची या रुग्णालयात कायमच गर्दी असते. या रुग्णालयासह शहराच्या विविध भागांत ५० हून अधिक खाटांची महापालिकेची रुग्णालये आहेत. महापालिकेच्या रुग्णसेवेतील, त्रुटींबाबत, सुधारणांबाबत चर्चा होत असते. मनुष्यबळाची कमतरता, वैद्यकीय स्टाफवर येणारा अतिरिक्त ताण हे मुद्दे चर्चेत येत असतात. रुग्णवाहिका सेवेबद्दल मात्रकोणीही मुद्दा उपस्थित करीत नाही. त्यामुळे रुग्णवाहिका सेवा दुर्लक्षित राहिली आहे.महापालिकेच्या वैद्यकीय विभागासाठी अद्यापपर्यंत शववाहिका घेण्यात आली नाही. परिणामी महापालिकेच्या ताफ्यातील रुग्णवाहिकांचाच वापर अनेकदा शववाहिनी म्हणून करण्यात आला आहे. २०१४ पर्यंत वायसीएमच्या ताफ्यात ८ रुग्णवाहिका होत्या. त्यात एका खासगी कंपनीने एक रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्याने ही संख्या ९ झाली होती. आता ही संख्या ११ झाली आहे. तीन पाळ्यांमध्ये रुग्णवाहिकांसाठी १८ चालक आहेत. आणखी १५ चालक कंत्राटी पद्धतीने घेण्यात आले आहेत.केवळ रुग्णांची वाहतूक करण्यासाठी त्या उपयोगात येतात. या रुग्णवाहिकांमध्ये रुग्णसेवेसाठीची अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे नाहीत. शहरात कोणाला हवी असल्यास १५० रुपये शुल्क आकारून ही रुग्णवाहिका उपलब्ध होते. मात्र, जिल्ह्याबाहेर रुग्णवाहिका नेण्यास परवानगी नाही.>खासगी रुग्ण-वाहिकेकडे धाववायसीएमच्या आवारात रुग्णवाहिका उभ्या असल्याचे पहावयास मिळते. मात्र त्यातील किती रुग्णवाहिका सुस्थितीत आहेत, याबद्दलची शाश्वती नाही. महापालिकेच्या ११ रुग्णवाहिका सुस्थितीत असत्या, तर शवागाराजवळ खासगी रुग्णवाहिकांची गर्दी झालेली दिसली नसती. वायसीएममधील रुग्णांना महापालिकेची रुग्णवाहिका तातडीने उपलब्ध होत नाही. त्यामुळे अनेकदा रुग्णांचे नातेवाईक खासगी रुग्णवाहिकांकडे धाव घेताना दिसून येतात. नागरिकांच्या सेवेसाठी लोकार्पण केल्याचे सांगितले जात असले, तरी वायसीएमच्या आवारातील खासगी रुग्णवाहिकांना ते सांगतील तो दर देणे भाग पडते.
रुग्णवाहिका बनल्या शववाहिका!, ताफ्यात ११, रस्त्यावर धावतात दोनच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 12:22 AM