- भानुदास पऱ्हाड
आळंदी : तीर्थक्षेत्र आळंदीत पोलीस ठाणे ते ग्रामीण रुग्णालयापर्यंतच्या रस्त्यावर बेकायदेशीर रहदारीने झालेल्या अडथळ्यामुळे रुग्णाला घेऊन जाणारी रुग्णवाहिका अडकली. परिणामी वेळेत उपचार न मिळाल्याने एका २१ वर्षीय युवतीला आपला जीव गमवावा लागला. रविवारी (दि.५) सायंकाळी ही दुर्दैवी घटना घडली.
उज्वला नामदेव झाडे (वय २१ रा. आळंदी) असे मृत झालेल्या युवतीचे नाव आहे. घराच्या गॅलरीतून आंब्याच्या झाडावरील आंबे काढत असताना उज्वलाचा तोल जाऊन ती जमिनीवर खाली पडली. यामध्ये तिच्या डोक्याला गंभीर स्वरूपाची दुखापत झाली. परिस्थिती पाहता तत्काळ उपचारासाठी रुग्णवाहिकेतून उज्वलाला आळंदीतील ग्रामीण रुग्णालयाच्या दिशेने नेण्यात आले. दरम्यान रुग्णालयाच्या रस्त्यावर असणाऱ्या गर्दीमुळे रुग्णवाहिका २० ते २५ मिनीटे अडकून पडली. त्यानंतर रुग्णवाहिका रुग्णालयात नेण्यात आली. मात्र उपचारापूर्वी उज्वलाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
दरम्यान, रात्री उशिरा वायसीएम रुग्णालयात मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. रुग्णवाहिकेतील मुलांच्या व इतर व्यक्तींच्या माहितीनुसार आळंदी पोलीस स्टेशन जवळील ग्रामीण रुग्णालयाकडे जाणाऱ्या चौकापर्यंत उज्वलाचा श्वासोच्छ्वास सुरू होता. दुर्दैवाने वेळेवर रुग्णालयात न पोहोचल्याने उज्वलाला जीव गमवावा लागला अशी माहिती नातेवाईकांनी दिली.
आळंदी पोलीस स्टेशन ते आळंदी ग्रामीण रुग्णालय या रस्त्यावर दुतर्फा बेकायदेशीरपणे पार्किंग केलेली दुचाकी वाहने, हातगाड्या, दुतर्फा भाजी विक्रेते व इतर विक्रेते उभे असतात. त्यामुळे या रस्त्यावर प्रवाशांना अडथळ्यांना सामोरे जावे लागत आहे. ग्रामीण रुग्णालयात रुग्णवाहिका आणताना कसरत करावी लागते अशी माहिती डॉ. शुभांगी नरवाडे यांनी दिली.
नगरपरिषदेच्या आदेशाला केराची टोपली.... पोलीस ठाणे ते आळंदी ग्रामीण रुग्णालयापर्यंत मुख्य रस्त्यावर भाजी विक्रेते, फळविक्रेते, फेरीवाले आदी बसल्यास तसेच सदर ठिकाणी कोणी वाहने लावल्यास कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात येईल असा आदेश तत्कालीन मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी काढला होता. आदेशाचे फलकही त्याठिकाणी बसवण्यात आले होते. परंतु नगरपरिषदेच्या आदेशाला केराची टोपली दाखवून दुतर्फा भाजी विक्रेते इतर विक्रेते बसत आहेत. तसेच बेकायदेशीर वाहनेही लागत आहेत.
भाजी मंडई शाळा क्र. ४ च्या मैदानावर भरणार...आळंदी नगरपरिषदेच्या हद्दीत ग्रामीण रुग्णालयाच्या मार्गावरील भरली जाणारी भाजी मंडई आळंदी नगरपरिषदेच्या शाळा क्र. ४ च्या मैदानावर तात्पुरत्या स्वरूपात भरविण्यात येणार असल्याचे आळंदी नगरपरीषदेचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले आहे.