पिंपरी :गर्भवती महिला तनिषा भिसे यांचा उपचारांत दिरंगाई केल्याने मृत्यू झाला. या संदर्भातील पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर ठपका ठेवण्यात आला आहे. रुग्णालयावरील कारवाईचा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे मंगळवारी रात्री उशिरा दाखल झाला आहे, दोन दिवसात कारवाई होण्याची शक्यता आहे, अशी माहिती आमदार अमित गोरखे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात उपचार घेण्यासाठी गेलेल्या तनिषा भिसे यांना डिपॉझिट भरले नाही मृत्यू झाला होता. याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन चौकशी समिती नेमल्या होत्या. तसेच महिला आयोगानेही या प्रकरणाची दखल घेतली होती. त्यानुसार राज्य शासनाला अहवाल सादर केला आणि त्यावरून कारवाई संदर्भातील अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर झाला आहे.याविषयी आमदार अमित गोरखे यांना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, 'दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या दिरंगाई संदर्भात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनीही मंगळवारी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. आम्ही सर्वांनी चुकीच्या गोष्टींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली. त्यानुसार कारवाई संदर्भातील अहवाल तयार झालेला आहे. दोनच दिवसात कारवाई होईल, असे अपेक्षित आहे.' इंडियन मेडिकल असोसिएशन ऑफ इंडियाचे महाराष्ट्र अध्यक्ष डॉ संतोष कदम यांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे डॉ. सुश्रुत घैसास यांची बाजू घेतली आहे. याविषयी अमित गोरखे म्हणाले, 'आज सकाळी सोशल मीडियावर डॉ. कदम यांचे विधान ऐकायला मिळाले. त्याबद्दल आश्चर्य वाटले. डॉ असूनही त्यांचा अभ्यास कच्चा आहे आणि त्यांनी खोटी माहिती दिली आहे. त्यांच्या मतानुसार रुग्णालयाने इस्टिमेट दिले. डिपॉझिट पावती भरली नव्हती. सर्व घटनेला डॉ घैसास जबाबदार नसून डॉ. केळकर जबाबदार आहेत. मला वाटतं यानिमित्ताने या दोन्ही गोष्टींची चौकशी होणे गरजेचे आहे. त्याचबरोबर मृत्यू झालेल्या मातेला बदनाम करण्याचे काम आहे, असं मला वाटतं. त्यांनी खोटी माहिती दिली.
कॅन्सरची थेरेपी सुरू होती. रेडिएशन दिले गेले होते. मग ती माता गर्भवती राहणे शक्य होते का? रुग्ण भिसे या दिनांक ४ एप्रिल २०२४ पासून डॉ घैसास यांच्याकडे उपचार घेत होत्या. त्यावेळी त्यांनी मूल होण्यासाठी डॉ मानसी घैसास यांच्याकडे आयव्हीएफची ट्रीटमेंट घ्यावी, अशी सूचना केली होती. मात्र त्याऐवजी रुग्णाने इंदिरा आयव्हीएफमधून उपचार घेतले आणि दीड वर्षानंतर प्रेग्नेंसी संदर्भात दिनांक २ मार्चला डॉ. घैसास यांच्याकडे गेल्या. पत्नीच्या संस्थेत उपचार न घेतल्याचा राग डॉ. घैसास यांना आला असावा. त्यानंतर दिनांक २५ मार्चला गेल्यानंतर सुरुवातीला वीस लाख व त्यानंतर दहा लाख रुपये जमा करावेत, डॉक्टरांनी सांगितले. या निमित्ताने सुशांत आणि डॉ घैसास यांचेही कॉल रेकॉर्ड तपासावेत, त्यातून खरी माहिती पुढे येईल.'