पिंपरी : गेल्या पाच वर्षांत पिंपरी-चिंचवडमध्ये शहरात भाजपाने जनतेच्या हिताची, भ्रष्टाचारमुक्त असणारी दहा कामे दाखवा, पुन्हा शहरात पाऊल ठेवणार आहे, असे आव्हानच शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी भाजपला दिले आहे. पिंपरी-चिंचवड शहरात राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा झाला. त्यात माजी आमदार विलास लांडे, माजी महापौर, शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी महापालिकेच्या कारभारावर टीका केली. तर डॉ. अमोल कोल्हे यांनी भाजपाला आव्हानच दिले.त्यांनी दिल्लीपासून गल्लीपर्यंत भाजपाचा चुकीचा कारभार कसा सुरू आहे, याचा पाढा वाचला.
२०१७ च्या महापालिका निवडणूकीपूर्वी आश्वासनांचा पाऊस पडला होता. ती गाजराची शेती होती, अशी चर्चा आता शहरात रंगू लागली आहे. औद्योगिकनगरी असणाऱ्या पिंपरी-चिंचवडला पिण्याच्या पाण्याची प्रश्न भेडसावत आहे? असे सांगून अमोल कोल्हे म्हणाले, ''देशातील परिस्थिती पहिली, तर शेतकरी, कामगार वर्गांचा आवाज दडपला जात आहे. २०१७ पूर्वी विकास म्हटले की पिंपरी-चिंचवड, रस्ते म्हटले की पिंपरी-चिंचवड. पिंपरी-चिंचवड म्हटले की अजित पवारांचे नाव घेतले जायचे. मात्र, ही ओळख बदलली आहे.
गेल्या पाच वर्षांत महापालिकेतील भ्रष्टचारमुक्त असणारी दहा कामे दाखवा, पुन्हा शहरात पाऊल ठेवणार नाही. फक्त दहा कामे, जनतेच्या हिताची आणि भ्रष्टाचारमुक्त दाखवा, असे चॅलेंजच त्यांनी दिले. तसेच, हजारो कोटी रुपये कंपन्यांच्या घशात घालणारा वेस्ट टू एनर्जी प्रकल्प कुठंवर आलाय. या शहराचे दोन हिस्से कोणी केले. नक्की मक्तेदारी कुणाची आहे. याची उत्तरे मिळायला हवीत. ही उत्तरे शहराच्या विकासासाठी, कल्याणासाठी आगामी काळातील पुढील पिढ्याच्या विकासासाठी जनतेला मिळायला हवीत. ती उत्तरे मिळविण्याचा अधिकार प्रत्येकाचा आहे.’’, असेही कोल्हे यांनी म्हटले.