पिंपरी : सायबर गुन्हेगारांकडून कोट्यवधींचा गंडा घालण्यात येत आहे. अशा प्रकरणांमध्ये फसवणूक झालेली कोट्यवधींची रक्कम ‘होल्ड’ करण्यात पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सायबर सेलला यश आले आहे. तसेच सायबर चोरट्यांनी फसवणूक करून ऑनलाइन ट्रान्सफर केलेल्या एक कोटी ३० लाखांची रक्कम परत मिळवण्यात आली.
वर्क फ्राॅम होम तसेच गुंतवणुकीतून जादा परतावा देण्याच्या बहाण्याने किंवा टास्क फ्राॅडच्या माध्यमातून फसवणूक होते. अनेक जण आमिषाला बळी पडून सायबर चोरट्यांच्या जाळ्यात अडकतात. ऑनलाइन पद्धतीने झालेल्या फसवणुकीची तक्रार ऑनलाइन करावी लागते.
केंद्रीय गृहमंत्रायलाची हेल्पलाइन
देशभरात सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया सोपी करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रायलयाने https://cybercrime.gov.in/ ही वेबसाईट उपलब्ध करून दिली आहे. या पोर्टलवर १९३० हा हेल्पलाइन क्रमांकही उपलब्ध आहे. हा क्रमांक डायल केल्यानंतर राज्यातील भाषेनुसार पर्याय निवडता येतो. या हेल्पलाइनसाठी प्रत्येक राज्यात नोडल कार्यालय आहे. या कार्यालयाकडे ‘काॅल’ वर्ग केला जातो. महाराष्ट्रासाठी मराठी भाषेतून हेल्पलाइनवरून संवाद साधला जातो. तक्रार सविस्तर समजून घेतली जाते.
स्थानिक पोलिसांकडे वर्ग होते तक्रार
नॅशनल सायबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टलवर नोंदविलेली तक्रार स्थानिक पोलिसांच्या सायबर सेलकडे वर्ग केली जाते. सायबर सेलकडू संबंधित स्थानिक पोलिस ठाण्याकडे तक्रार वर्ग केली जाते. संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास केला जातो.
तक्रार करावी कशी?
फसवणूक झालेले अनेकजण पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील सायबर सेलकडे धाव घेतात. तक्रार ऑनलाइन नोंदवण्यात तांत्रिक तसेच इतर बाबींमुळे अडचणी येतात. ही बाब लक्षात घेऊन सायबर सेलकडून तक्रारदाराला मार्गदर्शन केले जाते. तसेच प्रसंगी सायबर सेलच्या पोलिसांकडून तक्रार नोंदविण्यासाठी सहकार्य केले जाते.
‘स्काॅड’मध्ये १८ अधिकारी, ३६ अंमलदार
पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत १८ पोलिस ठाणे आहेत. प्रत्येक पोलिस ठाणे स्तरावर एक सायबर स्काॅड स्थापन केला आहे. त्यात एक पोलिस उपनिरीक्षक आणि दोन पोलिस अंमलदार अशा तिघांचा समावेश आहे. त्यानुसार १८ पोलिस ठाण्यांमधील स्काॅडमध्ये १८ उपनिरीक्षक आणि ३६ अंमलदार आहेत.
सायबर सेलकडून प्रशिक्षण
पोलिस ठाण्यांच्या सायबर स्काॅडमधील अधिकारी व अंमलदारांना सायबर सेलकडून प्रशिक्षण देण्यात आले आहे. सायबर फसवणुकीबाबत नॅशनल सायबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टलवर तक्रार कशी नोंदवावी, आवश्यक माहिती, कागदपत्रे आदी तपशील अपलोड करण्याबाबतचे प्रशिक्षण दिले.
‘गोल्डन अवर’मध्ये रक्कम ‘होल्ड’
पोलिस ठाण्यांच्या सायबर स्काॅडमध्ये प्रशिक्षित अधिकारी व अंमलदार असल्याने तक्रारदाराला तक्रार नोंदविण्यासाठी सहकार्य केले जाते. त्यामुळे फसवणूक झालेली रक्कम संबंधित बँक खात्यांमध्ये ‘होल्ड’ केली जाते.
‘सायबर फ्राॅड’मधील ‘होल्ड’ केलेल्या कोट्यवधी रुपयांपैकी एक कोटी ३० लाखांवर रक्कम परत मिळवण्यात यश आले आहे. सायबर स्काॅडमुळे स्थानिक पोलिस ठाण्यांतच तक्रारदारांना मदत उपलब्ध होत आहे. - वैभव शिंगारे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सायबर सेल, पिंपरी-चिंचवड