तळेगाव दाभाडे (पुणे) :वडगाव मावळ येथील श्री पोटोबा महाराज मंदिरालगत असलेल्या ऐतिहासिक तळ्यात बुडून आठ वर्षीय शाळकरी मुलाचा मृत्यू झाला. समर बाळू कराळे (वय ८ रा. वडगाव मावळ) असे मृताचे नाव आहे. ही दुर्घटना सोमवारी (दि .८) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास उघडकीस आली. समर कराळे हा वडगाव मावळ येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत इयत्ता तिसरीच्या वर्गात शिकत होता. तो गुणी व हुशार विद्यार्थी होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समर रविवारी (दि. ७) रेल्वे स्टेशन जवळील घराच्या अंगणात खेळत असताना बेपत्ता झाला, अशी फिर्याद त्याची आजी सुनीता दत्तात्रय सुपेकर यांनी वडगाव मावळ पोलिस ठाण्यात दिली. समर हा वडगाव येथे त्याच्या आजी-आजोबांकडे राहत होता. रविवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास अंगणात खेळत असताना तो बेपत्ता झाला. त्याचा सर्वत्र शोध घेतला असता सोमवारी सायंकाळी ५:३० च्या सुमारास पोटोबा महाराज मंदिरामागील तळ्यात त्याचा मृतदेह आढळून आला.
श्री पोटोबा महाराज मंदिराशेजारी असलेल्या ऐतिहासिक तळ्याची दुरवस्था झाली आहे. येथील भिंतीची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या या तळ्याच्या भोवताली मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती आहे. दर गुरुवारी तळ्याच्या काठावर आठवडे बाजार भरत असतो. पडझड झालेल्या संरक्षक भिंतीचे काम तातडीने करणे गरजेचे आहे. तळेगाव दाभाडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक ऋतुजा मोहिते करत आहेत.