पिंपरी : खासगी कंपनीत अकाउंट मॅनेजर तरुणीची ऑनलाइन रेटिंगचा टास्क देऊन पैसे कमाविण्याचे आमिष दाखविले. टास्कच्या माध्यमातून मिळालेली रक्कम मोठी असून ती रक्कम काढण्यासाठी पैसे पाठविण्यास सांगून तरुणीची १० लाख ५८ हजार ८०१ रुपयांची फसवणूक केली. प्राधिकरण निगडी येथे २४ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर २०२३ या कालावधीत फसवणुकीचा हा प(कार घडला.
अकाउंट मॅनेजर तरुणीने याप्रकरणी सोमवारी (दि. २५) निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात मोबाइल धारक, बँक खातेधारक, युपीआय आयडीधारक यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी ही एका खासगी कंपनीत अकाउंट मॅनेजर आहे. तिच्या मोबाइलवर दिव्या सिंग नावाच्या अनोळखी महिलेने काॅल केला. प्रिपेड टास्कव्दारे ऑनलाइन रेटिंगचा टास्क दिला. त्या माध्यमातून पैसे कमाविण्याचे आमिष दाखवले. वेळोवेळी टास्क देऊन त्याचा मोबदला म्हणून देण्यात येणारी रक्कम मोठी आहे. ती रक्कम काढण्यासाठी तुम्हाला काही रक्कम भरावी लागेल, असे सांगून फिर्यादी तरुणीला पैसे पाठविण्यास सांगितले. पैसे घेतल्यानंतर संशयितांनी फिर्यादी तरुणीला ब्लाॅक करून त्यांची १० लाख ५८ हजार ८०१ रुपयांची फसवणूक केली. पोलिस निरीक्षक (गुन्हे) तेजस्विनी कदम तपास करीत आहेत.