नारायण बडगुजर
पिंपरी : लोकसभेच्या मावळ मतदारसंघात विधानसभेचे पनवेल, उरण, कर्जत, मावळ, चिंचवड आणि पिंपरी असे सहा मतदारसंघ आहेत. यातील पिंपरी मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. त्यामुळे दलित आणि मुस्लिम तसेच बहुजन मतदार नेमकी कुणाला पसंती देतात याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. वंचित बहुजन आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्रपणे लढले. या मतदारसंघात मतांचे ध्रुवीकरण झाले आणि त्याचा फटका महाआघाडीच्या पार्थ पवार यांना बसला. राष्ट्रवादी काँग्रेसने प्रतिष्ठेची केलेली मावळ लोकसभा मतदारसंघातील लढत लक्षवेधी ठरली. ‘काँटे की टक्कर’ होईल, अशी अपेक्षा राजकीय जाणकारांकडून व्यक्त केली जात होती. प्रचारादरम्यान तसे चित्रही तयार करण्यात आले होते. मात्र ही निवडणूक एकतर्फी झाल्याचे निकालातून स्पष्ट झाले. पिंपरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे नगरसेवक जास्त आहेत. तसेच दिग्गज पदाधिकारी आणि स्थानिक नेतेही याच मतदारसंघात आहेत. त्यामुळे गटतटही आहेत. पार्थ पवार यांच्या उमेदवारीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व गटतट एकत्र आले. तसेच ‘स्टार उमेदवार’ अशी पार्थ यांची प्रतिमा तयार करण्यात आली. त्यामुळे त्यांचे पारडे जड वाटत होते. वैयक्तिक गाठीभेटींवरही राष्ट्रवादीकडून भर देण्यात आला. असे असले तरी पार्थ पवार यांचे चुकलेले पहिले भाषण, दापोडीत वादग्रस्त धर्मगुरुंची घेतलेली भेट, सोशल मीडियावर व्हायरल झालेले त्यांचे वैयक्तिक फोटो आणि व्हिडिओ आदी विविध नकारात्मक बाबींना मतदारांपुढे नेत त्यांच्या विरोधकांनी त्यांच्या सोयीसाठी फायदा केला. दलित आणि मुस्लिम तसेच बहुजनांची मते मिळविण्यात राष्ट्रवादीला यश आले नाही. महायुतीतर्फे स्थानिक पातळीवर भक्कमपणे प्रचारयंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते त्यांच्या पातळीवर प्रचारात सक्रिय होते. शिवसेनेचा आमदार असल्याचाही फायदा झाला.
विधानसभेसाठी महायुतीच्या उमेदवारांच्या आशा पल्लवीत
खासदार श्रीरंग बारणे यांच्या विजयामुळे पिंपरी मतदारसंघात विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीत इच्छुकांची संख्या वाढून त्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. सध्या शिवसेनेचा आमदार असल्याने शिवसेना दावा सांगणार आहे. मात्र आरपीआयच्या आठवले गटाकडूनही या मतदारसंघासाठी आग्रह होत आहे. तसेच भाजपातही काही दिग्गजांनी तयारी केली आहे. त्यामुळे महायुतीत बंडखोरांची संख्या वाढणार आहे. तसेच वंचित बहुजन आघाडी, मनसे व काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात आघाडी होईल की, नाही यावरही विधानसभा निवडणुकीचे राजकीय गणिते बदलणार आहेत.
की फॅक्टर काय ठरला?१) पवार कुटुंब पुरोगामी आहे. असे असतानाही पार्थ यांनी दापोडी येथे वादग्रस्त धर्मगुरुंची भेट घेतल्याचा मुद्दा चर्चेत राहिला.२) पिंपरी मतदारसंघात महाआघाडीने मोठ्या सभा घेतल्या नाहीत. महायुतीतर्फे आदित्य ठाकरेंचा ‘युवा संवाद’ परिणामकारक ठरला.३) मोदी यांच्या नावाचे गारुड आणि महायुतीच्या आरपीआय आठवले गट, भाजपा आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचे मनोमिलन श्रीरंग बारणे यांच्यासाठी फायदेशीर ठरले.