नारायण बडगुजर-पिंपरी : दाटीवाटीची झोपडपट्टी असलेल्या चिंचवड येथील आनंदनगर कोरोनामुक्त झाले आहे. यासह साईबाबानगर, इंदिरानगर या झोपडपट्ट्यांमध्येही कोरोनाचा सध्या एकही रुग्ण नाही. महापालिका प्रशासनाने विशेष उपाययोजना करून त्रिसुत्रीचा अवलंब केला होता. परिणामी या तीनही झोपडपट्ट्या कोरोनामुक्त झाल्या आहेत. त्यामुळे प्रशासनासह स्थानिकांना दिलासा मिळाला असून, या भागात चैतन्याचे वातावरण आहे.
मुंबईतील धारावी प्रमाणेच चिंचवड येथील आनंदनगर झोपडपट्टीत लोकसंख्येची घनता जास्त आहे. येथील लोकसंख्या १० हजारांवर आहे. तसेच इंदिरानगर येथील लोकसंख्या पाच हजार तर साईबाबानगर येथील लोकसंख्या साडेबाराशे आहे. या तिन्ही झोपडपट्ट्यांमध्ये दाटीवाटीने हजारो कुटुंबे वास्त्यव्यास आहेत. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगसह इतर निर्देशांचे व प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन सहजासहजी शक्य होत नव्हते. तसेच झोपडीतील कमी जागेत कुटुंबातील सरासरी चार ते पाच सदस्य राहतात.
मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात कोरोनाचा पहिला रुग्ण शहरात आढळला. सुरवातीच्या टप्प्यात शहरातील मोठ्या झोपडपट्ट्या कोरोनापासून बचावल्या होत्या. मात्र त्यानंतर उच्चभ्रू वसाहतीतून हा विषाणू झोपडपट्टीपर्यंत पोहचला. आनंदनगर झोपडपट्टीत १३ मे रोजी पहिला रुग्ण आढळला. त्यामुळे प्रशासनाची धावपळ झाली. आनंदनगर प्रतिबंधंधित क्षेत्र म्हणून घोषित केले गेले. मात्र तरीही रुग्ण संख्या वाढतच राहिली. त्यानंतर दहाव्या दिवशीच अर्थात २४ मे रोजी ३९ इतके रुग्ण एकाच दिवशी आढळले. एकाच दिवशी सर्वाधिक रुग्ण आढळलेली ही संख्या आहे. त्यामुळे स्थानिकांचा रोष वाढला. ते रस्त्यावर आले. त्यांच्या रोषात भर पडतच राहिली आणि ८ जून रोजी त्याचा उद्रेक होऊन आनंदनगर येथे दगडफेक झाली.
दगडफेकीच्या घटनेमुळे महापालिका प्रशासनाच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. त्यानंतर प्रशासनाने धोरणात्मक बदल केले. त्रिसूत्रीचा अवलंब करून कोरोनावर मात करण्यासाठी स्थानिकांना विश्वासात घेतले. त्यांचा प्रतिसाद लाभला आणि झोपडपट्टी कोरोनामुक्त झाली.
तीन ‘टी’ची त्रिसूत्री ठरली परिणामकारकट्रेसिंग, टेस्टिंग आणि ट्रिटमेन्ट अर्थात शोध मोहीम, तपासणी आणि उपचार या त्रिसूत्रीचा अवलंब केला. शोध मोहीम राबवून घरोघरी भेटी देण्यात आल्या. त्यातून आजारी लक्षणे असलेल्या तसेच संशयित रुग्णांची कोरोना तपासणी केली. त्यात पाॅझिटिव्ह रिपोर्ट आलेल्या रुग्णांवर योग्य उपचार केले. त्यामुळे संसर्ग रोखण्यास मदत झाली.
त्रिसूत्रीची अंमलबजावणी केली. तसेच स्थानिकांच्या उद्रेकाची कारणे शोधून काढली. स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून जेवण तसेच धान्याचे किट उपलब्ध करून दिले. त्यांना विश्वासात घेऊन उपाययोजना केल्या. त्यामुळे स्थानिकांचा रोष कमी होऊन प्रशासनाला सहकार्य मिळाले. परिणामी झोपडपट्ट्या कोरोनामूक्त झाल्या.- चंद्रकांत इंदलकर, तत्कालीन क्षेत्रीय अधिकारी, महापालिका
आनंदनगर इंदिरानगर साईबाबानगरपहिला पाॅझिटिव्ह रुग्ण १३ मे २ मे ५ जूनशेवटचा पाॅझिटव्ह रुग्ण २४ नाेव्हेंबर ३ नोव्हेंबर २१ नोव्हेंबरसर्वाधिक रुग्ण आढळलेला दिवस २४ मे - ३९ रुग्ण २७ जून - १९ ११ जून - २० रुग्णएकूण रुग्ण संख्या ३२८ १३२ १०६बरे झालेले रुग्ण ३२७ १३० १०६मृत्यू संख्या १ २ --