रावेत : जनजागृती करूनदेखील काही नागरिक रस्त्याच्या कडेला कचरा टाकत असल्याचे प्रकार शहरात घडत आहेत. सीसीटीव्ही कॅमेरे बसवूनही रात्री अंधाराचा फायदा घेऊन काही नागरिक कचरा रस्त्यावर टाकत असल्याचे दिसून येते. वाल्हेकरवाडीतील गुरुद्वारा चौकात अशाच प्रकारे कचरा रस्त्यावर टाकण्यात येत होता. याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. संबंधित ठिकाणी सूचना फलकही लावले. मात्र फारसा उपयोग झाला नाही. त्यामुळे काही तरुणांनी शक्कल लढविली. कचरा टाकण्यात येणाऱ्या ठिकाणावर एक दगड शेंदूर फासून ठेवण्यात आला. त्या दगडाला फूल, हार अर्पण करून अगरबत्ती लावण्यात आली. त्यामुळे येथे कचरा टाकण्याचे प्रकार पूर्णपणे बंद झाले आहेत. त्यामुळे स्वच्छतेसाठी धावून आला देव, अशी उपरोधिक चर्चा येथे सुरू आहे.
काही नागरिक गुरुद्वारा चौकातील मुख्य मार्गावर सायंकाळी कचरा टाकत असत. त्यामुळे या परिसरात सर्वत्र घाण आणि दुर्गंधी होती. याबाबत स्थानिकांनी महापालिकेच्या आरोग्य विभागाला सांगितले. त्यानंतर सफाई कर्मचाºयांकडून येथील कचरा उचलण्यात येत होता. मात्र दररोज ‘जैसे थे’ परिस्थिती निर्माण होत असे. हा प्रकार थांबावा आणि कचरा टाकण्यास आळा बसावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत होती. मात्र कचरा टाकण्याचे प्रकार थांबत नव्हते. त्यामुळे काही तरुणांनी शक्कल लढवत एका दगडाला शेंदूर फासून झाडाखाली ठेवला. त्यानंतर येथे कचरा टाकण्याच्या प्रकारांना आळा बसला. एका रात्रीत हा बदल दगडाला शेंदूर फासल्याने झाला. शेंदूर फासल्याने दगडाचा देव झाला. त्यामुळे येथे दर्शन घेऊन नमस्कार करण्यासाठी नागरिक थांबतात. ‘देव बाजारचा भाजीपाला नाही रे’ असे म्हणत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी दांभिकतेवर प्रहार केलेला आहे. याच शिकवणीत घाणीची तुलना पापाशी करण्यात आली होती. परंतु स्वच्छतेमुळे देवाच्या समीप जाणे शक्य होते, असे सांगितले जाते. कदाचित यामुळेच इंग्रजीतील ‘क्लीनलीनेस इज नेक्स्ट टू गॉडलीनेस’ अर्थात, स्वच्छता म्हणजे देवपण हा वाक्प्रचार रूढ झाला असावा. स्वच्छ भारत अभियानांतर्गत जनजागृतीसाठी मोठा खर्च होतआहे. परंतु त्याचा म्हणावा तेवढा परिणाम झालेला दिसून येत नाही. केवळ काही रुपयांचा शेंदूर फासलेल्या दगडाच्या देवाने मात्र स्वच्छता राखण्यासाठी मदत केली आहे.