बेल्हा : बेल्हा (ता. जुन्नर) येथील यादववाडी परिसरात भक्ष्याचा पाठलाग करताना सहा वर्षे वयाचा बिबट्या विहिरीत पडला. ग्रामस्थ, पोलीस व वनखात्याच्या कर्मचाºयांनी विहिरीत पिंजरा सोडून बिबट्या पिंजऱ्यात अलगद अडकला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यादववाडी येथे देवराम पिंगट यांची विहीर आहे. शुक्रवारी (दि. ५) पहाटेच्या सुमारास वंदना पिंगट या विहिरीजवळ मोटार चालू करण्यासाठी आल्या असताना त्यांना विहिरीतून आवाज आला. त्यांनी विहिरीत डोकावून पाहिले असता बिबट्या मोटारीच्या पाईपला धरून बसलेला पाहिले. त्यांनी घरी जाऊन सांगितले असता घरच्यांनीही खात्री केल्यावर त्यांना बिबट्या दिसला. त्यांनी ताबडतोब वनखात्याच्या कर्मचाºयांना ही माहिती दिली.
वनखात्याच्या कर्मचाºयांनी या ठिकाणी येऊन खात्री केली. या ठिकाणी कुत्र्याचा पाठलाग करताना हा बिबट्या विहिरीत पडला होता. या विहिरीत एक कुत्रेही मेलेले दिसत होते. वनखात्याच्या कर्मचाºयांनी सर्वप्रथम या पाण्यात पडलेल्या बिबट्यासाठी एका झाडीला चारी बाजूने दोर बांधले. त्यानंतर माणिकडोह येथून पिंजरा आणण्यात आला. त्यानंतर त्या पिंजºयाला चारी बाजूने दोर बांधून पिंजरा पाण्यात झाडीजवळ सोडला. त्यानंतर लगेचच तो बिबट्या अलगदपणे पिंजऱ्यात अडकला. सहा ते सात तास बिबट्या पाण्यातच होता. तो खूपच थकलेला दिसत होता. मात्र पिंजºयात अडकल्यानंतर तो बिबट्या लोकांवर गुरगुरत होता. हा बिबट्या मादी जातीचा असून सहा वर्षे वयाचा आहे.