पिंपरी : अंगणवाडी सेविका मदतनिसांच्या मानधनवाढीचा निर्णय व्हावा या व इतर मागण्यांसाठी येत्या १ एप्रिलपासून राज्यातील १ लाख अंगणवाड्यांचा संप करण्याचा निर्णय अंगणवाडी सेविका मदतनिसांच्या संघटनाच्या राज्य कृती समितीने घेतला आहे. पुणे व पिंपरी चिंचवडमधील सुमारे ३ हजार अंगणवाड्या १ एप्रिल पासून बंद राहतील. येत्या २ एप्रिलला होणा-या पल्स पोलिओ मोहिमेवर बहिष्कार घालण्याचेही अंगणवाडी कर्मचारी सभेच्या बैठकीत ठरवण्यात आले. बंदच्या पहिल्या दिवशी सकाळी ११ वाजता ससूनजवळील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून, जिल्हाधिकारी कचेरीवर प्रचंड मोर्चा काढण्याचाही निर्णय बैठकीत झाला. अंगणवाडी संघटना मानधनवाढीसह विविध मागण्यांसाठी सातत्याने संघर्ष करत आहेत. मानधनवाढीविषयी प्रस्ताव तयार करण्यासाठी राज्य शासनाने समिती नेमली होती. राज्य अर्थसंकल्पात या समितीने दिलेल्या अहवालाचा विचार करण्यात आलेला नाही. त्यामुळे या बंदमध्ये सहभाग होण्याचा निर्णय अंगणवाडी कर्मचारी सभेच्या व्यापक बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी नितीन पवार होते. या बैठकीला पुणे व पिंपरी चिंचवड येथील सर्व प्रकल्पांच्या शेकडो प्रतिनिधी हजर होत्या.मानधनवाढ समितीच्या ५ बैठका होऊन समितीने आपला प्रस्ताव मागील महिन्यात शासनास सादर केला आहे. त्यात सेवा जेष्ठतेनुसार मानधन वाढ व इतर दुरुस्त सूचनाही अंगणवाडी कृती समितीने सुचवल्या आहेत. मात्र, याची दखलही राज्य अर्थसंकल्पात घेण्यात आली नाही. नागपूरला हिवाळी अधिवेशनात कृती समितीच्या वतीने जोरदार आंदोलन केले गेले. अर्थसंकल्पीय अधिवेशना आधी १० मार्चला पुन्हा आझाद मैदानात मोर्चाद्वारे मागण्यांचा आवाज बुलंद केला गेला . प्रतिसाद न मिळाल्याने १ एप्रिलपासूनच्या बेमुदत बंदची नोटीस समितीने दिली. शेवटच्या मानधनवाढीला ६ वर्षे झाली आहेत.(प्रतिनिधी)प्रलंबित मागण्यांकडे लक्ष देणार कोण?अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविकांना सन्माननीय जीवन मिळण्यासाठी शासकीय कर्मचा-यांचा दर्जा, वेतनश्रेणी व अन्य सर्व लाभ देण्यात यावेत.मानधनवाढ समितीच्या प्रस्तावाप्रमाणे मानधनवाढ ताबडतोब मंजूर करून त्यासाठी लागणारी आर्थिक तरतूद करावी. मिनी अंगणवाडीला पूर्ण अंगणवाडीचा दर्जा द्यावा. मानधन, प्रवास व बैठक भत्ता तसेच आहाराचे अनुदान किंवा इंधनभत्ता ह्या कमा दर महिन्याला देण्यात याव्यात.सेवामुक्त सेविका, मदतनिसांना तातडीने सेवासमाप्ती लाभ अदा करण्यात यावा. राज्य कामगार विमा योजना व भविष्य निर्वाह निधीची योजना तयार करून अंगणवाडी क्षेत्राला लागू करावी.मानधन आॅनलाईन पद्धतीने खात्यात जमा करताना विम्याचा हप्ता किंवा अंगणवाडी कर्मचारी पतसंस्थेचा हप्ता लेखी परवानगीने कपात करण्याची व्यवस्था करावी. सेविका व मदतनिसांच्या रिक्त जागा तातडीने भरण्यात याव्यात. आजारपण, बाळंतपणामुळे दीर्घ रजेवर असलेल्या सेविकांच्या जागी काम करणा-या सेविका किंवा मदतनिसांना सेविकांच्या मानधनाच्या अर्धा मोबदला देण्यात यावा. जुन्या सेविका, मदतनिसांसाठी सेवासमाप्तीसाठीचे वय ६५ ठेवावे पण नवीन भरतीसाठी ६० करावे.
अंगणवाडीसेविकांचा १ एप्रिलपासून संप
By admin | Published: March 29, 2017 1:53 AM