रावेत : दोन दिवसांपूर्वी चिंचवड येथील मित्राला अशोक वाळके भेटायला जात असताना रस्त्यावर पाणी साचल्यामुळे खड्डयांचा अंदाज आला नाही. त्यामुळे गाडी घसरून वाळके यांचा दळवीनगर -बिजलीनगर या रस्त्यावर अपघात झाला होता. अपघातात डोक्याला जबरी मार लागल्यामुळे ते जागीच बेशुद्ध झाले होते. त्या वेळी बघ्यांची गर्दी जमली होती. त्या गर्दीतूनच परमेश्वर पुजारी नावाच्या तरुणाने त्यांना तशा परिस्थितीमध्ये उचलून चिंचवड येथील खासगी दवाखान्यात दाखल केले. तीन तासानंतर त्यांना शुद्ध आली. रस्त्यावरील दररोज अपघात होतात. बघ्यांची गर्दी होते, पण त्यातून पुजारी सारखा एखादाच तरुण अशा समयी मदत करतो. बघ्यामधून मदतीला कोणीच पुढे येत नव्हते. परंतु, परमेश्वर यांनी त्यांना रुग्णालयात उपचारांसाठी नेण्याचा निर्णय घेतला. वास्तविक त्या ठिकाणी अनेक जण उभे होते़ पण पुजारी यांनी जी माणुसकी दाखवली तशी माणुसकी दाखवण्याचा दुर्दैवाने विचारही तिथे असलेल्या अन्य कुणाच्याही मनात आला नाही. तंत्रज्ञानाच्या युगात माणुसकी लोप पावत आहे; पण आकुर्डीतील नागरिक अशोक वाळके यांना माणुसकी जिवंत असल्याचा प्रत्यय या निमित्ताने आला.
अपघातातील जखमीसाठी ‘परमेश्वर’ बनला देवदूत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2017 2:48 AM