लोकमत न्यूज नेटवर्ककामशेत : शासनाच्या विविध खात्यांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित राहत नसल्याबद्दल कामशेतकरांनी सोमवारी ग्रामसभेत नाराजी प्रकट केली. महाराष्ट्र दिनी होणारी ग्रामसभा कोरमअभावी तहकूब करावी लागली होती. ती सोमवारी सकाळी १० वाजता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रिंकू बालवाडी येथे सरपंच सारिका शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. उपसरपंच गणपत शिंदे, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक बाळासाहेब मतकर व ग्रामस्थ उपस्थित होते. कामशेतची लोकसंख्या मोठी असूनही ग्रामसभेला १६ सदस्यांपैकी सरपंचांसह सात सदस्य आणि ३४ ग्रामस्थांनी हजेरी लावली होती. ग्रामसभा हे ग्रामस्थांचे हक्काचे व्यासपीठ असूनही स्थानिकांची उदासीनता प्रकर्षांने दिसत आहे. प्रत्येक ग्रामसभेला ठरावीक जागरूक नागरिकच उपस्थित राहत असल्याचे दिसत आहे. मावळात चोऱ्या व दरोड्याचे प्रमाण वाढत असून, धामणेगावातील दरोड्यात तीन जणांचा बळी गेला. गावांच्या सुरक्षेसाठी ग्रामसुरक्षा दल स्थापन करण्याचे ठरविण्यात आले आहे. त्या संदर्भात पोलीस प्रशासनाने दिलेले पत्र ग्रामसेवकांनी वाचून दाखवले. पण, पोलीस ठाण्यातील एकही अधिकारी अथवा कर्मचारी एकाही ग्रामसभेला उपस्थित राहत नाही. ग्रामसुरक्षा दल स्थापन कसे करायचे, दलात किती सदस्य, सदस्यांची कामे काय या विषयी ग्रामस्थांमध्ये संभ्रम आहे. याबाबतची माहिती कोण देणार, हा प्रश्न नागरिकांनी उपस्थित करून पोलिसांच्या उदासीनतेबाबत नाराजी व्यक्त केली. या विषयावर चर्चाही झाली. पोलीस अधिकारी अथवा कर्मचारी पुढील ग्रामसभेला उपस्थित राहिल्यास यावर विचार करावा, अशी मागणी नागरिकांनी केली. ग्रामसेवकांनी अहवालाचे वाचन करून शासनाच्या योजनांची माहिती दिली. कृषी योजना, कृषी औजारे व तांत्रिक उपकरणांची अनुदानासह माहिती वाचून दाखवली. खासगी दवाखान्यांच्या प्रमाणपत्राचा विषय नागरिकांनी पुन्हा उपस्थित करण्यात आला. तालुका व जिल्हा आरोग्य विभाग अवैध डॉक्टर व हॉस्पिटलवर कारवाई करणार आहे, असे त्यांनी सांगितले. नागरिकांच्या लेखी प्रश्नांची उत्तरे या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातील विशेष ग्रामसभेत देण्यात येतील, असे सांगून ग्रामसभा संपन्न झाली.
अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीबद्दल नाराजी
By admin | Published: May 09, 2017 3:40 AM