- प्रकाश गायकर
पिंपरी : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारण अजित पवार यांच्या नावाभोवती फिरत आहे. पवार भाजपमध्ये जाऊन नव्याने सत्ता स्थापन करणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. मात्र, त्यासाठी अजित पवार यांच्या पाठीमागे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील ३६ आमदारांचे संख्याबळ असणे आवश्यक आहे. पिंपरीचे आमदार आण्णा बनसोडे यांनी अजित पवार जिकडे जातील तिकडे त्यांच्यासोबत जाणार, अशी भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे बारामतीतील या बंडाच्या ठिणगीला पिंपरीतून फुंकर मिळत असल्याची चर्चा रंगली आहे.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीवेळी पिंपरी विधानसभा मतदारसंघातून लढण्यासाठी अनेक इच्छुक होते. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून एका महिला नगरसेविकेला उमेदवारी जाहीर करण्यात आली. ऐनवेळी ही उमेदवारी बदलून आण्णा बनसोडे यांना देण्यास अजित पवार यांनी भाग पाडले. त्यानंतर एका रात्रीमध्ये सूत्रे फिरवत अजित पवार यांनी अण्णा बनसोडे यांना एबी फॉर्म दिला. बनसोडे यांनी याबाबत कोणताही गाजावाजा न करता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात जात निवडणुकीचा अर्ज भरला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून महिला उमेदवार नसून आण्णा बनसोडे हे रिंगणात असल्याचे समजले. पक्षाने तिकीट न देता केवळ अजित पवार यांच्यामुळे आण्णा बनसोडे यांना उमेदवारी मिळाली. त्यामुळे तेव्हापासून बनसोडे पवार यांचे खास मानले जातात.
जिकडे दादा तिकडे अण्णा...
विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर राज्यामध्ये महाविकास आघाडीचा प्रयोग सुरू झाला. मात्र, त्यानंतर अचानक अजित पवार यांनी भाजपसोबत भल्या पहाटे शपथ घेत सरकार स्थापनेचा दावा केला. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सर्व आमदार पक्षासोबत राहिले. केवळ पिंपरीचे आमदार बनसोडे हे नॉट रिचेबलच होते. २०१९ ला उमेदवारी दिल्यापासून बनसोडे अजित पवार यांच्यासोबत सावलीसारखे आहेत. ‘जिकडे दादा तिकडे आण्णा’ असाच प्रयत्न आण्णा बनसोडे यांचा आहे. त्यामुळे आता अजित पवार यांच्या बंडाची चर्चा सुरू झाल्यानंतर त्यांच्यासोबतच असल्याचे बनसोडे यांनी पुन्हा एकदा जाहीर केले.