लोकमत न्यूज नेटवर्कवाकड : ताथवडेतील मुंबई-बंगळूर महामार्गाकडे जाणाऱ्या रस्त्याची चिरफाड करून कासवगतीने सुरू असलेल्या पाणीपुरवठा विभागाच्या कामामुळे ताथवडेकरांची त्रेधातिरपीट सुरू आहे. त्यांची नित्याची वाट महापालिकेने अतिशय बिकट बनवून या रस्त्यावर अक्षरश: राडा घातला आहे. संथगतीने सुरू असलेले काम वाटसरूंच्या जीवावर बेतत आहे. या रस्त्यावर जेएननर्मच्या माध्यमातून महापलिका पिण्याचे पाणीपुरवठा करणाऱ्या सहाशे व्यासाची मोठी पाईपलाईन बसवीत आहे़ मात्र, गेल्या तीन महिन्यांपासून हे काम अतिशय संथगतीने सुरू असून नुकताच झालेल्या पावसामुळे या कामाचा फज्जा झाल्याने नागरिकांना मोठा फटका बसत आहे़ सुमारे दीड कि़मी़चा हा रस्ता पार करण्यासाठी रहिवाशांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. भर रस्त्यात खोदलेले मोठाले खड्डे, सर्वत्र चिखल-गाळ, राडारोड्याने रस्ता माखून दाणादाण उडाली आहे़ त्यातच तो चिखल मातीने निसरडा होऊन धोकादायक बनला आहे. सातत्याने होणारी वाहतूककोंडी, अपघाते आणि वाहने चिखलात रुतण्याचे प्रकार यामुळे ग्रामस्थ, रहिवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. बिकटावस्था झालेल्या या रस्त्यावर गेल्या आठवड्याभरात सुमारे ५० दुचाकी घसरून अनेक जण गंभीर जखमी झाले. मागील काही दिवसात तर २० हून अधिक अवजड वाहने चिखलात रुतले आहेत. या अवजड वाहने मधेच चिखलात रुतल्याने वाहतुककोंडीला वाहनचालकांना सामोरे जावे लागत आहे. अशा वेळी सर्वांचीच मोठी पंचाईत होते मग स्वत:च्याच घरी अथवा इच्छितस्थळी जाण्यासाठी मोठा पाच कि़मी़चा वळसा मारण्याची नामुष्की येथील रहिवाशांवर ओढावत असल्याने सर्वांचाच तिळपापड होत आहे. अखेर मंगळवारी संतप्त ग्रामस्थांनी कामगारांना याबाबत जाब विचारीत काम बंद पाडण्याचा पवित्रा घेतल्याने दोन दिवसांपासून काम बंद आहे. मात्र, या रस्त्यावरून जाण्याचे म्हणजेच अग्निदिव्यातून जाण्याचा धोका कायम आहे.
ऐन पावसाळ्यात खोदाईला मुहूर्त
By admin | Published: June 30, 2017 3:43 AM