पिंपरी : जिल्हा क्रीडा परिषद आणि पिंपरी-चिंचवड महापालिका आयोजित जिल्हास्तर शालेय आणि महिला क्रीडा स्पर्धांचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.सुब्रतो मुखर्जी चषक शालेय फुटबॉल स्पर्धा नुकत्याच झाल्या. विविध गटांच्या शालेय फुटबॉल स्पर्धा १७ आॅगस्टपासून मासूळकर कॉलनीतील डॉ. हेडगेवार क्रीडा संकुलात सुरू होणार आहेत. कॅरम स्पर्धा २१ ते २४ आॅगस्ट दरम्यान हेडगेवार संकुलात होतील. थ्रो बॉल स्पर्धा १८ ते २३ आॅगस्ट दरम्यान इंद्रायणीनगर, भोसरी येथील संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुलात रंगणार आहेत. कुस्तीच्या फ्री स्टाईल आणि ग्रीको रोमन स्पर्धा २२ आणि २३ आॅगस्टला भोसरीच्या महेशदादा स्पोर्ट्स फाउंडेशन येथे होणार आहेत. मल्लखांब आणि रोप मल्लखांब स्पर्धा २२ आॅगस्टला निगडीच्या ज्ञानप्रबोधिनी विद्यालय येथे होतील. हॅण्डबॉल स्पर्धा २६ ते ३१ आॅगस्ट दरम्यान एचए स्कूल येथे होणार आहेत. तलवारबाजी स्पर्धा २८ आणि २९ आॅगस्टला कासारवाडी येथील मनपा शाळेत होतील. बॉल बॅडमिंटन स्पर्धा २९ ते ३१ आॅगस्ट दरम्यान निगडीच्या अमृता विद्यालय येथे खेळल्या जातील. नेहरु चषक हॉकी स्पर्धा २९ ते ३१ आॅगस्ट दरम्यान नेहरुनगर येथील मेजर ध्यानचंद हॉकी पॉलिग्रास मैदानात होणार आहेत. मुष्टियुद्ध स्पर्धा २९ ते ३१ आॅगस्ट दरम्यान संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुलात होतील. बास्केटबॉल स्पर्धा २८ आॅगस्ट ते २ सप्टेंबर दरम्यान चिंचवडच्या कमलनयन बजाज विद्यालयात रंगणार आहेत. क्रिकेट स्पर्धा ३१ आॅगस्ट ते ३० सप्टेंबर दरम्यान नेहरुनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडिअमवर खेळल्या जातील. टेबल टेनिसच्या विविध गटांच्या स्पर्धा १ ते ६ सप्टेंबरदरम्यान संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल, इंद्रायणीनगर, भोसरी येथे खेळल्या जाणार आहेत. तायक्वोंदो स्पर्धा ६ ते १० सप्टेंबरदरम्यान यमुनानगर येथील स्केटिंग हॉलमध्ये होतील.शालेय हॉकी स्पर्धा १ ते ६ सप्टेंबरदरम्यान पॉलिग्रास मैदानावर होतील. वेटलिफ्टिंग स्पर्धा १ सप्टेंबरला मगर स्टेडिअममध्ये होणार आहेत. जिम्नॅस्टिक्स स्पर्धा ९ सप्टेंबरला ज्ञानप्रबोधिनी येथे, तर ज्युदो स्पर्धा ७ आणि ८ सप्टेंबरला निगडी प्राधिकरणातील मदनलाल धिंग्रा बॅडमिंटन हॉलमध्ये होणार आहेत. खो-खो स्पर्धा ७ ते १४ आॅक्टोबर दरम्यान वडमुखवाडी येथील सयाजीनाथ विद्यालयात आणि किकबॉक्सिंग स्पर्धा ७ ते १० आॅक्टोबरदरम्यान संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुलात होतील.जलतरण, डायव्हिंग, वॉटरपोलो स्पर्धा ८ आणि ९ सप्टेंबरला मगर स्टेडिअममध्ये रंगणार आहेत. बॅडमिंटन स्पर्धा ९ ते १६ सप्टेंबर दरम्यान संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुलात, शूटिंगबॉल स्पर्धा १५ आणि १६ सप्टेंबरला मगर स्टेडिअममध्ये आणि योगासन स्पर्धा ९ आणि १० सप्टेंबरला संत तुकारामनगर येथील दीनदयाल विद्यालयात होणार आहेत. रोलर स्केटिंग, रोलर हॉकी स्पर्धा मोहननगर येथील स्केटिंंग मैदान आणि यमुनानगर येथील स्केटिंग हॉलमध्ये होतील.
शालेय क्रीडा स्पर्धांचे नवीन वेळापत्रक जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2017 2:57 AM