पिंपरी : महापालिकेच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आरोग्यसेविका (एएनएम) मुलाखतीद्वारे १६ व १७ मार्चला होणारी भरती प्रक्रिया प्रशासकीय कारणास्तव ऐनवेळी रद्द करण्यात आली. त्यामुळे बाहेर गावांहून आलेल्या विद्यार्थ्यांना मनस्तापाला सामोरे जावे लागले.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आरोग्यसेविका (एएनएम) या रिक्त पदासांठी ७ मार्च रोजी जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्यानुसार १६ व १७ मार्च रोजी आरोग्य सेविका या पदाकरिता थेट मुलाखती चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आयोजित करण्यात आल्या होत्या. मात्र, प्रशासकीय कारणास्तव ही भरती प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी, असे आवाहन डॉ. साळवे यांनी केले.
दरम्यान, परीक्षा रद्द झाल्याचे परीक्षार्थींना माहिती नव्हते. यामुळे मालेगावसह राज्यातील विविध भागातून परीक्षार्थी बुधवारी (दि. १६) सकाळीच महापालिका भवन परिसरात जमा झाले होते. अचानक परीक्षा रद्द केल्याने त्यांनी संताप व्यक्त केला. महापालिकेच्या गलथान कारभाराचा या परीक्षार्थींना आर्थिक आणि मानसिक मनस्ताप सहन करावा लागला.
आयुक्तांनी भेट नाकारली
परीक्षेसाठी महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांतून विद्यार्थी आले होते. अचानक परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांना मनस्तापाला सामोरे जावे लागले. त्याचा जाब विचारण्यासाठी काही विद्यार्थी महापालिकेत आले असता त्यांची भेट घेण्याचीही तसदी आयुक्तांनी घेतली नसल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.
काल दुपारी परीक्षा रद्द करण्याची मान्यता मिळाली. त्यानंतर त्वरित प्रेसनोट आणि महापालिका संकेतस्थळावर टाकण्यात आले. तसेच ज्या ठिकाणी परीक्षा तेथे एक फ्लेक्स लावून परीक्षा रद्दची माहिती जाहीर केली आहे. व्हाॅट्सॲपच्या विविध ग्रुपवर परीक्षा रद्द करण्यात आल्याबाबत माहिती टाकण्यात आल्याचे वैद्यकीय विभागाकडून सांगण्यात आले.