पिंपरी : मेफेड्रोन विक्री प्रकरणी अटक केलेल्या पोलिस उपनिरीक्षकाचे आणखी कारनामे उघड होऊ लागले आहेत. अर्जावरून दाखल केलेल्या गुन्ह्यातील संशयिताला अटक न करण्यासाठी साडेतीन लाख रुपये मागितल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे. येत्या काही दिवसात याबाबतचा आणखी एक गुन्हा संबंधित उपनिरीक्षकाच्या विरोधात दाखल होण्याची शक्यता आहे.
विकास शेळके (नेमणूक - निगडी पोलिस ठाणे), असे अटकेत असलेल्या पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस उपनिरीक्षक विकास शेळके आणि नमामी शंकर झा याला सांगवी परिसरात ‘एमडी ड्रग्स’ बाळगल्या प्रकरणी अटक केली. त्यांच्याकडून आत्तापर्यंत ४७ किलो १९० ग्राम मेफेड्रोन पोलिसांनी जप्त केले. दरम्यान, अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून चौकशी सुरू असताना उपनिरीक्षक शेळके याचा आणखी एक कारनामा समोर आला.
न्यायालयाच्या आदेशानुसार मागील महिन्यात दाखल केलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यातील संशयिताला पोलिस उपनिरीक्षक शेळके याने नाशिक फाटा येथील उड्डाणपुलाखाली बोलावून घेतले. त्यानंतर संशयिताचा मोबाईल काढून घेत अटक न करण्यासाठी त्याच्याकडे साडेतीन लाख रुपयांची मागणी केली. याबाबत संबंधित संशयिताने तक्रार केली होती. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी चौकशी केली असता तक्रारीमध्ये तथ्य असल्याचे समोर आले. त्यामुळे उपनिरीक्षक शेळके याच्यावर आणखी एक गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.