शिवपुत्र संभाजी महानाट्यातून आत्ताच्या राजकीय परिस्थितीचेही उत्तर; खासदार अमोल कोल्हे यांचे भाष्य
By विश्वास मोरे | Published: May 4, 2023 08:54 PM2023-05-04T20:54:35+5:302023-05-04T20:55:49+5:30
जगदंब क्रियेशनच्या वतीने शिवपूत्र संभाजी या महानाट्याचे प्रयोग ११ मे पासून पिंपरी-चिंचवड शहरातील एच ए मैदानावर होणार आहेत.
पिंपरी : राज्यात एक महानाट्य सुरू असताना इकडे एक महानाट्य सुरू होतेय, ते बघायला या , प्रत्येकवेळी भाष्य करायची गरज नाही. शिवपुत्र संभाजी महानाट्य बघा. त्यात आत्ताच्या राजकीय परिस्थितीचही उत्तर मिळेल, असे मत प्रसिद्ध अभिनेते आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले.
जगदंब क्रियेशनच्या वतीने शिवपूत्र संभाजी या महानाट्याचे प्रयोग ११ मे पासून पिंपरी-चिंचवड शहरातील एच ए मैदानावर होणार आहेत. त्याअनुषंगाने डॉ. कोल्हे यांनी माध्यमांशी संवाद साधला. महानाट्याचे प्रयोग, भाजपाशी सलगीची चर्चा, राष्टÑवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा राजीनामा याविषयी माध्यमांनी प्रश्न विचारल्यानंतर १७ मेला याबाबत भूमिका मांडण्यात आली.
डॉ कोल्हे म्हणाले, ‘‘ स्वराज्याच्या दुसºया छत्रपतींचा इतिहास भावी पिढीला समजावा आणि त्यातून प्रेरणा घेण्यासाठी नक्की हे महानाट्य पाहावे. चित्तथरारक घोडेस्वारी, १२० फुटी रंगमंच ५५ फुटी तीन मजली किल्ल्याची प्रतिकृती, मराठे मोगल रणसंग्राम, २२ फुटी जहाजावरून जंजिर मोहीम, थेट प्रेक्षकांमधून जाणारी गनिमिकाव्याची बुºहाणपूर मोहीम, संपूर्ण मैदानाचा रंगमंच म्हणून वापरला आहे. तसेच शहरातील स्थानिक कलाकारांना देखील या महानाट्यात काम करण्याची संधी दिली आहे. तब्बल नऊ वर्षांनी हे महानाट्य पुन्हा भेटीला आले आहे.’’
शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला, याबाबत विचारले असता, कोल्हे म्हणाले, ‘‘नाट्यप्रयोग आणि आजारी असल्याने मी बाहेर आहे. शरद पवार सर्व बाजूने विचार करूनच निर्णय घेतात बाकी निर्णय समिती ठरवेल. त्यांनी घेतलेला निर्णय दूरगामी ठरणारा आहे. आता दिल की सुने या दिमागकी सुने, अशी अवस्था झाली आहे. इतर राजकीय परिस्थितीवर सद्या भाष्य करणं उचित ठरणार नाही. संभाजी महाराजांवरील महानाट्य प्रत्येक राजकारण्यांनी बघायला हवं. त्यामध्ये सर्वच उत्तरे मिळतात.’’
काही महिन्यांपूर्वीच्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबरचे छायाचित्र सोशल मिडीयावर गाजले होते. याविषयी विचारले असता, डॉ. कोल्हे म्हणाले, ‘‘शिवप्रताप गरूडझेपच्या पोस्टरच्या अनुषंगाने भेट झाली होती. त्यावरून विविध राजकीय वावड्या उठविल्या जात आहेत. त्यानंतर माझी संसदेत झालेली भाषणे सर्वांनी ऐकावीत, पहावीत. एखाद्या भेटीवरून कयास लावणे चुकीचे आहे.’’
नेता आणि अभिनेता भूमिकांना न्याय देता येतो का? यावर कोल्हे म्हणाले, ‘‘दोन्ही भूमिका आवडीच्या आहेत. दोन्ही भूमिकांना न्याय देण्याचा प्रयत्न असतो. तत्व आणि निष्ठा महत्वाची असते. मतदार संघातील जनतेशी संवाद ठेऊन कलचे कामही निष्ठेने करीत आहे. ’’