उर्से : येथील महिंंद्रा सीआय कंपनीतील स्वच्छतागृहात देशाविरोधी मजकूर आणि कंपनी उडविण्याची धमकी देणारा मजकूर लिहिल्याने तळेगाव पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकाराने तळेगाव परिसरात खळबळ उडाली आहे. कंपनीतील स्वच्छतागृहात देशाच्या नावाने ‘मुर्दाबाद’ असे कोणीतरी लिहिले आहे. ही बाब लक्षात येताच कंपनी अधिकाऱ्यांनी तातडीने सर्व कामगारांना बोलावून घेतले. हे कृत्य कोणी केले अशी विचारणा केली. मात्र, पुन्हा दुसऱ्या दिवशी तसाच प्रकार घडला. पुन्हा कोणीतरी असा मजकूर लिहिला. त्यामुळे कंपनीतील वातावरण बदलून गेले. अनुचित प्रकार घडू शकेल, या शक्यतेने गंभीर दखल घेत कंपनीचे वरिष्ठ अधिकारी विनायक कडसकर यांनी तळेगाव पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली. तळेगाव पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी तसेच पुण्यातील वरिष्ठ अधिकारी कंपनीत दाखल झाले. त्यांनी सर्व कंपनीत तपासणी केली. नोकरी निमित्ताने उत्तर प्रदेशाहून आलेल्या कामगारांचे महाराष्ट्रातील कामगारांमध्ये भांडण झाले होते. त्यांच्यातील वादातुन हे कृत्य घडले असावे, असे पोलीस निरीक्षक मुकुंद पाटील यांनी सांगितले. अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कंपनीतील काही कामगारांकडून मिळालेल्या माहितीनुसार स्वच्छतागृहात भारतविरोधी व शेजारील शत्रू देशाचा झिंदाबादचा मजकूर लिहिला होता. कंपनी बॉम्बने उडवून टाकू अशी धमकी देताना मोबाईल नंबरही लिहिला होता. (वार्ताहर)
देशविरोधी मजकुराने खळबळ
By admin | Published: February 20, 2017 2:51 AM