पिंपरी : लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सहाव्या दिवशी आठ जणानी अर्ज सादर केले आहेत. मावळ लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या आवारात असून, अर्ज नेण्यासाठी सहा दिवसांपासून सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी १४ जणांनी अर्ज नेले होते. दुसºया दिवशी १२, तर तिसºया दिवशी ८, चौथ्या दिवशी चार अशा एकूण ३८ जणांनी अर्ज नेले आहेत. त्यांपैकी गुरुवारी एक आणि शुक्रवारी सात जणांनी नऊ अर्ज सादर केले. सोमवारी आठजणांनी अर्ज सादर केले आहेत. राजाराम नारायण पाटील (वंचित बहुजन आघाडी), संजय किसन कानडे (बसप)अप्पा शामराव सोनवणे (क्रांतीकारी जयहिंद सेना), प्रकाश भिवाजी महाडिक (भारतीय नवजवान सेना), धर्मपाल यशवंत तंतरपाळे, प्रशांत गणपत देशमुख, अमृता अभिजित आपटे, राकेश प्रभाकर चव्हाण (अपक्ष) यांनी आर्ज दाखल केले आहेत. आज शेवटचा दिवस उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सकाळी अकरा ते दुपारी तीन ही वेळ आहे. तसेच नामनिर्देशन अर्जासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ९ एप्रिल आहे. शेवटचा दिवस असल्याने अर्ज भरण्याची तयारी करण्यात नेते आणि कार्यकर्ते मग्न आहेत.
लोकसभा निवडणुकीसाठी मावळमध्ये आठ जणांनी भरले अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2019 8:54 PM