पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपाची सत्ता आल्यानंतर ब्रॅँडिंगवर भर दिला आहे. त्यासाठी सोशल मीडियाचा वापर केला जाणार असून, महापालिकेने राबविलेल्या विविध योजना, उपक्रम, विकासकामांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी माध्यम समन्वयक संस्थेची नेमणूक करण्यात येणार आहे. त्यावर वर्षाला २५ लाखांची उधळपट्टी करण्यात येणार आहे.महापालिका विविध योजना, उपक्रम, विकासकामे राबवीत असते. अशा वेळी ही सर्व माहिती प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचण्यासाठी सोशल मीडिया हे प्रभावी माध्यम आहे. त्यामुळे सोशल मीडिया, तसेच रेडीओ, जिंगल्स, डॉक्युमेंटरी फिल्म्स, शॉर्ट फिल्म्स, लाँग फिल्म्स आदींच्या माध्यमातून ही माहिती जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी माध्यम समन्वयक संस्थेची नेमणूक करणे आवश्यक आहे. या कामासाठी महापालिकेतर्फे निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती. महापालिकेने माध्यम समन्वय संस्थेची निर्मिती केली आहे. या संदर्भातील विषयास मंजुरी दिली आहे.त्यासाठी दोन संस्थांच्या निविदा प्राप्त झाल्या. त्यातील कन्सेप्ट कम्युनिकेशन लिमिटेडची निविदा महापालिकेच्या दरापेक्षा सर्वांत कमी अर्थात ०.२ टक्के दराची प्राप्त झाली आहे. या संस्थेने हे काम २४ लाख ९५ हजार रुपयांमध्ये करून देण्याचे निविदेद्वारे मान्य केले आहे. त्यामुळे कन्सेप्ट कम्युनिकेशन लिमिटेड या संस्थेला महापालिकेच्याविविध विकासकामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम देण्यात आले आहे.
सोशल मीडियावर होणार उधळपट्टी, माध्यम समन्वयक संस्थेची नेमणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 2:55 AM