पिंपरी : गेल्या महिन्यात राज्यातील १०४ पोलिस निरीक्षकांना सहायक पदोन्नती देण्यात आली. त्यात पिंपरी - चिंचवड पोलिस दलातील सहा निरीक्षकांना बढती मिळाली. तसेच तीन सहायक आयुक्त नव्याने शहराला मिळाले. त्यानंतर शुक्रवारी (दि . ३) रात्री सहायक आयुक्तांची नेमणूक करण्यात आली.
सहाय्यक पोलिस आयुक्त भास्कर डेरे यांच्याकडे प्रशासन विभागाची जबाबदारी होती. त्यांची नेमणूक वाहतूक शाखेत करण्यात आली. त्यांच्यासोबत पिंपरी विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त सतीश कसबे यांची देखील वाहतूक शाखेत नेमणूक करण्यात आली. वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त विठ्ठल कुबडे यांची सहाय्यक पोलिस आयुक्त पिंपरी विभाग येथे नेमणूक झाली.
पदोन्नती झाल्यानंतर नव्याने शहरात दाखल झालेले मुगुटलाल पाटील यांच्याकडे सहाय्यक पोलिस आयुक्त प्रशासन या पदाची जबाबदारी देण्यात आली. सहायक पोलिस आयुक्त डॉ. विवेक मुगळीकर यांच्याकडे भोसरी एमआयडीसी विभागाची जबाबदारी दिली.
वाहतूक शाखेला दोन सहायक आयुक्त -
पिंपरी - चिंचवड वाहतूक शाखेसाठी आतापर्यंत केवळ एक सहायक पोलिस आयुक्त नियुक्त केले होते. दरम्यान, गेल्या महिन्यात शहर पोलिस दलात दाखल झालेले पोलिस उपायुक्त बापू बांगर यांच्याकडे वाहतूक शाखेची जबाबदारी देण्यात आली. त्यानंतर शुक्रवारी वाहतूक शाखेसाठी दोन सहाय्यक पोलिस आयुक्तांची नेमणूक करण्यात आली.
आणखी दोन सहायक आयुक्तांची प्रतीक्षा
पिंपरी - चिंचवड पोलिस दलात आठ सहायक आयुक्त होते. आणखी चार सहायक आयुक्तांसाठी पाठपुरावा करण्यात आला. त्यानुसार नव्याने चार सहायक पोलिस आयुक्त पदांना मंजुरी देण्यात आली. त्यातील दोन सहायक आयुक्तांची अद्याप प्रतीक्षा आहे.