शेलपिंपळगाव : खेडसह शिरूर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात मॉन्सूनपूर्व वरुणराजाच्या आगमनाने शेतकऱ्यांनी खरीप हंगामाच्या वाहतुकीस जोरात सुरुवात केली आहे. मृग नक्षत्र सुरु झाल्याने पावसाचा अंदाज बांधून बळीराजाने खरीप हंगामाची जय्यत तयारीही सुरु आहे. शेतक-यांनी पेरणीपूर्व शेतीची मशागत सुरु केली आहे. चांगला पाऊस पडल्यानंतरच शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिकांची पेरणी करावी, असा सल्ला ज्येष्ठ हवामान शास्रज्ञ व कृषी सल्लागार डॉ. रामचंद्र साबळे यांनी दिला आहे. खेडच्या पूर्व तसेच शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात गेल्या आठवड्यापासून वातावरणात बदल घडून कमालीची उष्णता जाणवत होती. मागील आठवड्याच्या गुरुवारपासून पावसासारखी परिस्थिती निर्माण होऊन जमिनीवर हलक्या सरी येत होत्या. मात्र, त्यानंतर पश्चिमेकडून पूर्वेकडे मोठ्या प्रमाणात मान्सूनसारखे ढग वाहू लागले आहे. हवामान उष्ण असल्याने सलग दोन-तीन दिवस पावसाच्या सरी कोसळत आहेत. मागील दोन्हीही दिवस विजेच्या कडकडटसह मान्सूनपूर्व वळवाच्या पावसाने परिसरात हजेरी लावली आहे.वळवाच्या पावसानंतर शेतीची पेरणीपूर्व मशागत करण्यास अधिक फायदा होत असल्याने हा पाउस अधिक फायद्याचा मानला जात असतो. गेल्या वर्षी मृग नक्षत्र संपूनही पावसाचे आगमन झाले नव्हते. यावर्षीही अशीच परिस्थिती उद्भवते की काय, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडला होता. मात्र पावसामुळे खरीप हंगाम वेळेत सुरु होईल, अशी आशा शेतकरी वर्गात दिसून येत आहे.वळवाच्या सरी कोसळल्यानंतर दिवसभर बळीराजाने शेतीची मशागत करण्यास सुरुवात केली आहे. पेरणीपूर्व खतावणी टाकून बैलांच्या किवा ट्रकरच्या साह्याने जमीन पेरणीलायक करण्यास शेतकरी मग्न झाला आहे. मुंबईकडेही आज सकाळी झालेल्या पावसामुळे या भागातही पावसाचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यानुसार आज सकाळपासूनच वातावरणात बदल जाणवत आहे. आकाशात पाणीदार ढगांची वर्दळ असल्याने हवेत गारवा निर्माण होऊन मान्सून पावसाची रिपरिप लवकरच सुरु होईल, अशी आशा शेतकरी बाळगून आहे. खरीपातील पिकांच्या पेरणीसाठी चांगल्या मोठ्या पावसाची अपेक्षा शेतकरी करत आहे. (वार्ताहर)
खरीपपूर्व पेरणीची लगबग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2015 4:49 AM