पिंपरी : पुण्यातील हाॅटेल मालक व मॅनेजर यांच्याशी हुज्जत घालून पैशांची मागणी केल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या नियंत्रण कक्षाच्या पोलीस उपनिरीक्षकाला त्वरित प्रभावाने निलंबित करण्यात आले आहेत. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी बुधवारी याबाबतचे आदेश दिले.
मिलन कुरकुटे, असे निलंबित केलेल्या उपनिरीक्षकाचे नाव आहे. पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुरकुटे हे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या नियंत्रण कक्षात नेमणुकीस आहेत. ते २१ ऑगस्टपासून वैद्यकीय कारणास्तव रजेवर होते. या रजा कालावधीत कुरकुटे मंगळवारी (दि. २४) पुणे येथे शासकीय गणवेशासह गेले. पुणे शहरातील मुंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हॉटेल कार्निव्हल या हॉटेलच्या मालक व मॅनेजरशी हुज्जत घालून पैशांची मागणी केली. याबाबतची माहिती मुंढवा पोलिसांनी पिंपरी-चिंचवड पोलिसांना दिली.
पोलीस खात्याची प्रतिमा मलीन करणाऱ्या अशोभनीय कृत्याबद्दल त्वरित प्रभावाने कुरकुटे यांना निलंबित करण्याचे आदेश आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिले. तसेच भारतीय संविधान अनुच्छेद ३११, २ (ब) अन्वये मिलन कुरकुटे यांना सेवेतून बडतर्फ करण्याबाबत कार्यवाही सुरू करण्यात येत असल्याचेही आदेशात नमूद केले आहे.
यापूर्वीही झाले होते निलंबन
हिंजवडी पोलीस ठाण्यात कार्यरत असताना लाच स्वीकारल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक मिलन कुरकुटे यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली होती. त्यामुळे त्यावेळी देखील कुरकुटे यांचे निलंबन झाले होते. त्यानंतर त्यांना पुन्हा पोलीस नियंतत्रण कक्षाशी संलग्न करण्यात आले. दरम्यान आयुक्तालयांतर्गत असलेल्या पोलिसांच्या कोरोना सेलमध्ये ते कार्यरत होते.