पिंपरी : किरकोळ भांडणाच्या कारणावरून पेट्रोल ओतून गॅरेज जाळले. त्यानंतर दोन्ही गटांनी तक्रार देण्यासाठी निगडीपोलिस ठाणे गाठले. दोन्ही गटात पोलिस ठाण्यातच वाद झाला. पोलिसांनी मध्यस्थी केली असता दोन्ही गटातील लोकांनी पोलिसांनाच धक्काबुक्की केली. फिरोज आयुब खान (३५, रा. ओटास्कीम, निगडी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चांद इस्माईल मुकरताल, हैदर मौला शेख, साजिद रज्जाक मुकरताल, मुजाहिद रज्जाक मुकरताल, इब्राहीम राजेसाहेब मुकरताल, सादिल आदिल अन्सारी (सर्व रा. ओटास्कीम, निगडी) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
फिर्यादी फिरोज यांचा भाऊ इमरान खान आणि मित्र राजू शेख यांच्यासोबत संशयितांचे भांडण झाले होते. त्या कारणावरून ते फिर्यादी फिरोज यांच्या गॅरेजवर आले. तुला आता सोडणार नाही, अशी धमकी दिली. त्यानंतर त्यांनी गॅरेजवर पेट्रोल ओतून गॅरेज पेटवून दिले. त्यात २५ हजार रुपयांचे नुकसान झाले. त्यानंतर फिरोज खान आणि संशयितांमध्ये वाद झाला.
हा वाद निगडी पोलिस ठाण्यात पोहोचला. निगडी पोलिस ठाण्यात दोन्ही गटातील लोक एकमेकांच्या विरोधात तक्रार देण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांच्यात पुन्हा वाद झाला. पोलिसांनी हा वाद सोडविण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी पोलिस अंमलदार अजित गोंदके यांना धक्काबुक्की करून सरकारी कामात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी पोलिस अंमलदार गोंदके यांनी सरकारी कामात अडथळा आणल्याची फिर्याद दिली.
त्यानुसार अरशद आयुब खान, बंदेअली अख्तरअली सय्यद (३३), आक्रम नफीस शेख (३४), शाहरुख सलाउद्दीन शेख (३०), फिरोज आयुब खान (३५), गौस सय्यद, नियामत शेख, अली सय्यद, इम्तियाज खान, हमीद इम्रान, आलम खान, रिजवान बागवान, इमरान आयुब खान, राजा आसिफ शेख, मोहम्मदसाद अब्दुला शेख (२५, सर्व रा. ओटास्कीम निगडी) आणि अन्य १० ते १२ जणांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. बंदेअली अख्तरअली सय्यद, आक्रम नफीस शेख, शाहरुख सलाउद्दीन शेख, फिरोज आयुब खान, मोहम्मदसाद अब्दुला शेख यांना पोलिसांनी अटक केली.