पिंपरी : वाढदिवसाच्या कार्यक्रमात किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणातून केलेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी रात्री साडे अकराच्या सुमारास देहूरोड येथील आंबेडकरनगर येथे घडली. विक्रम गुरव स्वामी रेड्डी (वय ३७) असे गोळीबारात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत नंदकिशोर रामपवित्र यादव यांनी देहूरोडपोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शब्बीर शेख आणि फैजल शेख यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देहूरोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विक्रम बनसोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदकिशोर यांचा भाऊ राजकुमार याच्या मुलीचा गुरुवारी वाढदिवस होता. त्यानिमित्त रस्त्याच्या कडेला मंडप टाकला होता. मंडपामध्ये जेवणाचे आयोजन केले होते. तसेच लहान मुले देखील तिथे खेळत होती. लोक जेवण करत असताना संशयित आरोपी तिथे आले. तुम्ही खूप मोठे झाले काय? असे म्हणत नंदकिशोर याला खुर्ची मारली. विक्रम रेड्डी हे भांडण सोडवण्यासाठी मध्ये आले होते. त्यामुळे आरोपींनी चिडून जाऊन विक्रम यांच्यावर गोळी झाडली. ही गोळी त्यांच्या छातीत लागली. त्यात गंभीर जखमी झालेल्या विक्रम यांना एका खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथून पिंपरीतील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान रात्री दीडच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.