पिंपरी : कोरोनाच्या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे उद्योगनगरी असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील मजुरांना राहण्याची तसेच जेवणाची समस्या सतावत आहे. अशा मजुरांनी त्यांच्या मूळगावी न जाता आहे तेथेच थांबावे. त्यांच्यासाठी प्रशासनाकडून राहण्याची तसेच जेवणाची व्यवस्था करण्यात येईल, अशी माहिती पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी ' लोकमत' ला शनिवारी दिली.
देशात कोरोनाग्रस्त रुग्ण आढळल्यानंतर नागरिकांमध्ये मोठी घबराट होती. असे असतानाच गेल्या आठवड्यात शुक्रवारी (20) पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाची लागण झालेला बारावा रुग्ण आढळला होता. त्यावेळी देशात सर्वाधिक रुग्ण पिंपरी-चिंचवडमध्ये होते. त्यामुळे शहरात जमावबंदी व त्यानंतर राज्यभरात संचारबंदी करण्यात आली. तसेच केंद्र सरकारनेही देशात लॉक डाउन केले. त्यामुळे मजुरांचा रोजगार बंद झाला आहे. काम नसल्यामुळे अनेक मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे तर काही मजूर मूळगावी जाण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त यांनी ह्यलोकमतह्णच्या माध्यमातून शहरवासीयांशी संवाद साधला आहे.
आयुक्त बिष्णोई म्हणाले,कोरोनाची लागण झालेल्या 12 रुग्णांपैकीत तीन जण बरे झाले. त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आणखी काही रुग्णांच्या तब्बेतीत सुधारणा झाली असून, त्यांनाही लवकरच घरी सोडण्यात येणार आहे. ही आपल्या सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे. तसेच आठवडाभरात एकही रुग्ण कोरोनाबाधित नसल्याचे समोर आले आहे. परिस्थितीचे गांभिर्य ओळखून शहरवासीयांनी संचारबंदीचे पालन केले. या सहकायार्चेच हे फलीत आहे. पालकांनी मुलांना बाहेर खेळण्यास जाऊ देऊ नये.? क्रिकेट आदी खेळामुळे मुलांचा एकमेकांशी संपर्क येतो. अशावेळी बॉल हाताळताना देखील विषाणूचा प्रादुर्भाव होऊ शकतो. तसेच सायंकाळी घराबाहेर पडून एकत्र येऊन नागरिकांनी गर्दी करू नये. औषधे, किराणा तसेच भाजीपाला खरेदी करण्यासाठी कुटुंबातील एकाच व्यक्तीने घराबाहेर पडावे. पिंपरी-चिंचवड उद्योगनगरी असल्याने येथे राज्यातून तसेच देशाच्या कानाकोप-यातून मजूर दाखल झाले आहेत. या मजुरांनी त्यांच्या मूळगावी न जाता आहे तेथेच थांबावे. त्यांच्यासाठी राहण्याची व जेवणाची व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात येणार आहे.ह्णह्ण
रक्तदान शिबिर व विविध संस्थांना सहकार्यकाही व्यक्ती, स्वयंसेवी, सामाजिक व इतर संघटना तसेच संस्था शहरातील गरीब, गरजू व मजुरांना मदत करण्यासाठी पुढे येत आहेत. त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा. त्यांना पोलिसांकडून पूर्णपणे सहकार्य करण्यात येईल. पोलिसांकडूनही झोपडपट्टी तसेच रस्त्यावरील नागरिकांना जेवण तसेच किराणा वाटप करण्यात येत आहे.
संचारबंदीचे उल्लंघन केल्यास होणार कारवाईसर्वत्र जमावबंदी, संचारबंदी व लॉक डाउन आहे. असे असतानाही काही नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरतात. अशा नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. शासन व पोलिसांच्या आदेशाचे उल्लंघन कोणीही करू नये, अन्यथा कारवाई करू, असे संदीप बिष्णोई यांनी सांगितले. तसेच नागरिकांनी थोडा त्याग केल्यास आपण कोरोनाविरुद्धची लढाई जिकू शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.