निगडी: बेकायदेशीरपणे विक्रीसाठी आणलेल्या मांडूळ जातीच्या सापांची तस्करी करणाऱ्या चौघांना निगडी परिसरातून पोलिसांनीअटक केली. त्यांच्याकडून एक मांडूळ साप जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी निगडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडी परिसरात मांडूळाची विक्री करण्यासाठी काही तरुण येणार असल्याची माहिती निगडी पोलीसांना मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप लोंढे यांच्या पथकाने निगडी येथील ट्रान्सपोर्ट नगर येथे सापळा रचून रविवारी आरोपींना ताब्यात घेतले. सैफ रौफ शेख (वय २३, रा. गणेशनगर वडगावशेरी, ता. हवेली), प्रमोद सुनील पाटील (वय २१, रा. बोऱ्हाडे वस्ती, खराडी) , दिनेश विजय नायर (वय २७, टिंगरेनगर ) , अमर रामदास उदलमले (वय ३१,शेंदाळे चाळ दापोडी) अशी आरोपींची नावे आहेत. विक्रीस व जवळ बाळगण्यास बंदी असलेला एक मांडूळ जातीचा साप त्यांच्याकडील पिशवीत आढळुन आला. त्याची किंमत सुमारे पंधरा लाख इतकी असून या चौघांवर वन्य प्राणी संरक्षण कायद्यानुसार निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी या पुर्वी देखील मांडूळ सापाची विक्री केली आहे का, तसेच ते हे साप कोणाला विक्री करणार होते याचा शोध पोलीस घेत आहेत. या प्रकरणी अधिक तपास निगडी पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक एल. एन. सोनवणे करीत आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्त आर.के.पद्मनाभन, अपर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक पोलीस आयुक्त सतिश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. निगडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप लोंढे,राजेंद्र निकाळजे, सतिश ढोले, विजय बोडके, राहुल मिसाळ, सोमनाथ दिवटे,स्वामीनाथ जाधव, रमेश मावसकर, गणेश शिंदे यांच,या पथकाने ही कारवाई केली.