लोणी काळभोर : दिवसा गुऱ्हाळावर व रात्रीच्या वेळी घरफोडी अथवा दरोडा टाकण्याचे काम करत असलेल्या उत्तर प्रदेशातील सहापैकी पाच परप्रांतीयांना गुन्हे शोध पथकाने जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून एक गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुसांसह सत्तूर, बटनाचा चाकू, स्क्रु-ड्रायव्हर अशी घातक हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.पोलीस निरीक्षक अभिमान पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय सतकुमार मलिक (वय २४ , रा. मनसुरपूर रेल्वे स्टेशनजवळ, ता. खतोली, जि. मुजाफ्फरनगर, उत्तर प्रदेश), नसिम बशीर धुमे (वय ४0, रा. शेखपुरा, अब्दुलपूरजवळ, ता. व जि. मेरठ, उत्तर प्रदेश), असिफ जाऊल मलिक (वय २४, रा. सोजुड, मेहराज मज्जिदजवळ, ता. व जि. मुजफ्फरनगर), अकबर अब्दुल चौधरी (वय २६, रा. पूरबालीयान, मिनारा मज्जिद जवळ, ता. खतोली, जि. मुजफ्फरनगर, उत्तर प्रदेश) व अनुज जसबिंरसिग चौधरी (वय ३0, रा. मनसुरपूर, ता. खतोली, जि. मुजफ्फरनगर, उत्तर प्रदेश), या पाच जणांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांचा सहावा साथीदार बिजेंद्र किसनचंद सिंग (रा.सिकासिलावर, उत्तर प्रदेश) हा अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी ठरला. लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत विद्युत रोहित्र चोरीस जाण्याचे प्रमाण वाढल्याने तसेच घरफोडी व चोऱ्या होत असल्याने २९ मार्च रोजी वरिष्ठांच्या आदेशानुसार सहायक पोलीस निरीक्षक अनिल गोपाळ, विकास बडवे, पोलीस हवालदार दत्तात्रय गिरमकर, गणेश पोटे हे रात्रगस्त करत होते. उरुळी कांचन, सोरतापवाडी, कुंजीरवाडी परिसरात गस्त घातली. नंतर हे पथक ३0 मार्च रोजी पहाटे १२.४0 च्या सुमारास सोलापूर-पुणे महामार्गावरील लोणी स्टेशन येथील मनोहर क्लॉथ सेंटर चौकात आले तेव्हा त्यांना महामार्गालगत दक्षिण दिशेस असलेल्या नाकोडा ज्वेलर्स या सोन्याच्या दुकानाच्या शटरजवळ सहा जण संशयास्पद स्थितीत बसलेले आढळून आल्याने पोलीस पथक गाडीतून खाली उतरले. हे पाहताच ते सहा जण पळू लागले. त्या वेळी पाच जणांना पाठलाग करून पकडण्यात आले. याकामी जनार्दन गोवर्धन दांडगे, शामराव गुलाब पुजारी (दोघे रा.लोणी स्टेशन) व सुनील बबन काळभोर (रा.रायवाडी,लोणी काळभोर) यांनी त्यांना मोलाची मदत केली. जेरबंद केलेल्या पाच जणांची झडती घेतली असता विजय मलिक याचेकडे स्क्रू-ड्रायव्हर, नसिम धुने याचेकडे एक बटनाचा चाकू, असिफ मलिक याचेकडे लोखंडी सत्तूर, अकबर चौधरी याचेकडे मिरची पावडर तर अनुज चौधरी याचेकडे गावठीकट्टा व आठ एमएम साईजची दोन जिवंत काडतुसे मिळून आली. हत्यारे पोलिसांनी जप्त केली आहेत.
परप्रांतीय दरोडेखोरांना अटक
By admin | Published: April 01, 2015 4:53 AM